इस्राइल आणि गाझापट्टीमधील संघटना असलेल्या हमासमध्ये मागच्या सव्वा वर्षापासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, या संघर्षानंतर काही देशांमध्ये ज्युविरोधी भावना निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्येही हा प्रकार वाढीस लागला असून,येथील न्यू साऊथ वेल्स येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णालयात तैनात असलेल्या एका नर्सने मी अनेक इस्रइली नागरिकांची हत्या केली आहे, असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य विभागाने नर्सने केलेल्या दाव्याचा तपास करण्याची घोषणा केली आहे. तसेच संबंधित रुग्णालयातील रुग्णांच्या नोंदीही तपासल्या जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, एका नर्सने इस्राइली नागरिकांना मारल्याचा दावा ऑनलाइन येत केला होता. त्यानंतर आम्ही रुग्णालयातील रुग्णांच्या रेकॉर्डची तपासणी सुरू केली आहे. मात्र रुग्णांना कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचवण्यात आल्याचे कुठलेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
मात्र नर्सने केलेला हा दावा ज्यूविरोधात होणारे हल्ले आणि विधानांच्या क्रमवारीमध्ये नव्याने समोर आलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात खळबळ उडालेली आहे. मागच्या वर्षभराहून अधिकच्या काळापासून इस्राइलमध्ये ज्यूविरोधी भावना तीव्र झाल्या आहेत. ज्यू समाजातील लोकांच्या घरांची मोडतोड, कार्यालये आणि व्यावसायिक संस्थांमध्ये हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. एवढंच नाही तर एक शाळा आणि दोन सिनेगॉगला आग लावण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.
दरम्यान, इस्राइली लोकांची हत्या केल्याचा दावा करणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे. आता ती राज्याच्या आरोग्य विभागात कधीही काम करू शकणार नाही, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.