Saudi Arabia Income by selling Dates : इस्लामचा सर्वात पवित्र महिना रमजान ( Ramadan ) काही दिवसांत सुरू होणार आहे. जगभरातील मुस्लिम बांधव यासंदर्भातील तयारीत व्यस्त आहेत. या महिन्याला उपासनेचा महिना म्हटले जाते. तसेच व्यावसायिक दृष्टीनेही महिना खूप फायदेशीर ठरतो. ३० दिवसांच्या उपवासांमध्ये मुस्लिम बांधव खजूर या फळाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. खजून हे एक विशेष फळ असून त्याच्या सेवनाने आवश्यक ती पोषक तत्वे शरीराला मिळतात. त्यामुळे उपवासादरम्यान खजूर खाल्ल्याने दिवसभर शारिरीक ऊर्जा टिकून राहण्या मदत होते. रमजानमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत खजूराचा पहिला नंबर लागतो. सौदी अरेबिया देश खजूराची सर्वाधिक विक्री करतो. जाणून घेऊया त्याबद्दल अधिकची माहिती.
सौदी अरेबिया खजूरांच्या विक्रीतून किती कमाई करतो?
रमजानच्या महिन्यात फलाहाराचे जास्त सेवन केले जाते. त्यातही खजूर हे फळ सर्वात वरच्या स्थानावर असते. सौदी अरेबिया केवळ तेलच नव्हे तर खजूरांचाही सर्वात मोठा उत्पादक देश आहे. सौदी अरेबियातील खजूर जगभर निर्यात केले जातात आणि रमजानमध्ये त्यांची खरेदी अनेक पटींनी वाढते. एका अहवालानुसार, सौदी अरेबिया आपल्या ७० टक्के खजूरांची निर्यात फक्त रमजानमध्ये करतो. सौदी अरेबियाच्या पर्यावरण, पाणी आणि कृषी मंत्रालयाने अहवाल दिला आहे की, सौदी अरेबियातून खजूर निर्यात ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे यातून एकूण १.२८ अब्ज सौदी रियाल ( ३४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ) झाली आहे. म्हणजेच सौदी अरेबिया खजूर विक्रीतून वर्षाला सुमारे २९ अब्ज ४८ कोटी रुपयांची कमाई करते.
आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राच्या मते, सौदीने ३०० हून अधिक प्रकारचे खजूर आतापर्यंत निर्यात केले आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की खजूर निर्यात करणाऱ्या एकूण ११३ देशांमध्ये सौदीचा पहिला क्रमांक लागतो.
१०२ देशांना भेट म्हणूनही पाठवतात खजूर
सौदी अरेबिया काही देशांना खजूर रमजानच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणूनही देतो. या वर्षी सौदी अरेबिया सरकारने जगातील १०२ देशांना भेट म्हणून ७०० टन खजूर पाठवले आहेत. या भेटवस्तू किंग सलमानच्या वतीने पाठवले जातात. सौदी अरेबिया दरवर्षी असे करतो आणि यावर्षीही ही परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा २०० टन जास्त खजूर इतर देशांमध्ये पाठवले जात आहेत. हा कार्यक्रम सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाद्वारे नियंत्रित केला जातो.