राजपुत्राला मिळाल्या दोन नोकऱ्या! ब्रिटनच्या महाराणीचा नातू एकदाचा पोटापाण्याला लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:44 AM2021-03-26T04:44:26+5:302021-03-26T04:44:43+5:30

स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठी बाहेर पडलेलं हे जोडपं पुढे काय करणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता प्रिन्स हॅरीने एक नव्हे तर दोन दोन नोकऱ्या स्वीकारल्याची बातमी आली आहे

The grandson of the Queen of Britain Prince Harry got two jobs! | राजपुत्राला मिळाल्या दोन नोकऱ्या! ब्रिटनच्या महाराणीचा नातू एकदाचा पोटापाण्याला लागला

राजपुत्राला मिळाल्या दोन नोकऱ्या! ब्रिटनच्या महाराणीचा नातू एकदाचा पोटापाण्याला लागला

Next

‘गेट अ जॉब ड्यूड’ - ब्रिटनमधले तरुण करदाते राजघराण्यातल्या आपल्या समवयीन ड्यूक आणि डचेसना गेली अनेक वर्षं हेच तर सांगत होते ! ... बाबांनो, काळ बदलला आहे, निदान आता तरी स्वत:साठी काही नोकरी उद्योग बघा! या सांगण्यामागचा सरळ उद्देश असा, की किती वर्षं तुम्ही आमच्या पैशावर जगणार? आणि अजून किती वर्षं नुसते उत्तमोत्तम कपडे घालून, राजमहालात राहून चॅरिटी इव्हेण्ट‌्स करत जगभर फिरणार? जरा तुमच्या राजवाड्यांबाहेर या, बाहेरची हवा खा, स्वत:साठी नोकरी-धंदा बघा आणि आपापल्या हिमतीवर आपापले संसार उभे करा! - प्रिन्सेस डायनाचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी याने हे सांगणं अखेर मनावर घेतलं आहे.

दूर तिकडे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन व्हॅलीत अवघ्या दोन दिवसात त्याने एक नव्हे - चक्क दोन नोकऱ्या घेतल्या आहेत. राजमहाल सोडून, आपल्या पत्नीला घेऊन घराबाहेर पडलेला ब्रिटनच्या महाराणीचा हा नातू अशारीतीने एकदाचा पोटापाण्याला लागला आहे! प्रिन्स हॅरी त्याच्या पौंगडावस्थेत मानसिक अस्वास्थ्याच्या त्रासातून गेलेला आहे. अगदी लहानपणी सोसलेल्या आईच्या वियोगाच्या अकाली आणि क्रूर तडाख्यातून प्रिन्स हॅरी बाहेर पडू शकला नाही. त्याचं पौंगड आणि तारुण्य हे त्या त्रासाच्या छायेतच गेलं. त्यामुळे संयमी आणि सुसंस्कृत अशा मोठ्या भावाच्या तुलनेत प्रिन्स हॅरी पहिल्यापासूनच तसा बंडखोर, काहीसा बेदरकार - राजघराण्याशी संबंधित लोकांच्या भाषेत सांगायचं तर ‘रफ’ - असाच मुलगा होता ! पुढे त्याची प्रेमप्रकरणं गाजली आणि त्याने घेतलेला लग्नाचा निर्णयही. मिश्रवंशाची, घटस्फोटीत आणि हॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून ख्यातकीर्त असलेली मेगन मर्केल प्रिन्स हॅरीशी विवाह करून लंडनच्या राजमहालात दाखल झाली तेव्हापासून या जोडप्याची चर्चा अख्ख्या जगभर होते आहे. त्यांचं लग्न गाजलं तसंच त्यांचं सारे पाश तोडून राजघराण्यापासून वेगळं होणंही अर्थातच जागतिक चर्चेचा विषय ठरलं. अलीकडेच या दोघांनी दिलेली तपशीलवार मुलाखत आणि राजघराण्याच्या कद्रूपणाचे सांगितलेले किस्से यामुळेही पुन्हा थोड्याशा का असेना, लाटा उसळल्याच!

स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठी बाहेर पडलेलं हे जोडपं पुढे काय करणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता प्रिन्स हॅरीने एक नव्हे तर दोन दोन नोकऱ्या स्वीकारल्याची बातमी आली आहे. कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या ‘बेटर अप’ नावाच्या स्टार्ट-अपने या राजपुत्राला नोकरी देऊन आपल्याकडे जगाचं लक्ष वेधून घेण्याची पहिली खेळी यशस्वी केली हे तर निश्चितच! जगभरातल्या कार्पोरेट कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी बऱ्याच जागरूक झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, वर्कशॉप्स आयोजित करण्याची कंत्राटं बेटर अपकडून घेतली जातात. बेटर अपकडे असलेली मानसिक आरोग्य-तज्ज्ञांची टीम जगभर सेवा देते. या कंपनीत प्रिन्स हॅरी ‘चीफ इम्पॅक्ट ऑफिसर’ म्हणून रुजू झाला आहे. बेटर अपचा संस्थापक अलेक्सी रोबियॉक्स प्रिन्स हॅरीच्याच वयाचा आहे. तो म्हणतो,  ‘हॅरी गेले दोन महिने आमच्या टीमबरोबर काम करतो आहे. मानसिक स्वास्थ्य या विषयाबाबतची त्याची तळमळ चकीत करणारी आहे आणि जाणकारीही!  मानसिक स्वास्थ्य किती निकडीचं आहे, याची जाणीव  त्यामुळे जगभरात होईल’.

ही पहिली नोकरी स्वीकारल्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत प्रिन्स हॅरीने आणखी एक जबाबदारी स्वीकारल्याची बातमी आली. माध्यम सम्राट रूपर्ट मरडॉक यांची सून कॅथरीन मरडॉक हीच्या पुढाकाराने अस्पेन इन्स्टिट्यूट ही ख्यातनाम संस्था चालवली जाते. या संस्थेच्या वतीने नुकतंच ‘‘कमिशन ऑन इन्फर्मेशन डिसऑर्डर’ नावाचा एक अभ्यास-प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या माहितीच्या स्फोटात वावरत असलेल्या जगाला खरं काय आणि खोटं काय, हे समजेनासं होऊन डोकं भ्रमीत व्हायची वेळ आली आहे. या माहितीच्या समुद्रातून बरं-वाईट वेचण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करणारा हा प्रकल्प सहा महिने चालणार आहे. त्याचं नेतृत्व करणाऱ्या एकूण चौदा संचालकांच्या तुकडीत प्रिन्स हॅरी सहभागी झाला आहे. सामाजिक संस्था, दबाव गट, व्यावसायिक माध्यम संस्था, देशोदेशीच्या शासन यंत्रणा आणि संशोधक-तज्ज्ञ या सर्वांनी मिळून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम केलं पाहिजे, असं प्रिन्स हॅरीला वाटतं. त्याचसाठी तो या प्रकल्पात सहभागी झाला आहे.

‘मला फक्त हॅरी म्हणा!’
महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्याला अन्य सहकाऱ्यांप्रमाणेच वागवण्यात यावं, असा आग्रह हॅरीने धरला आहे. आपल्याला प्रिन्स हॅरी नव्हे, तर फक्त हॅरी म्हणा, असं तो सर्वांना सांगतो. आता या दोन दोन नोकऱ्या करून संसार चालवण्याइतपत पैसे प्रिन्स हॅरी कमावणार का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण त्याचं उत्तर मात्र अजून गुलदस्त्यात आहे. कारण या दोन्हीही कंपन्या प्रिन्स हॅरीला पगार किती देणार, त्याचे आकडे अद्याप फुटलेले नाहीत.

Web Title: The grandson of the Queen of Britain Prince Harry got two jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.