Crime News: अमेरिकेत भारतीय व्यक्तीची कुटुंबासमोरच निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ब्रिटनमधून हादवरणारी घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील ओल्डबरी शहरात एका २० वर्षीय शीख मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केला. यादरम्यान तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी तिला 'तुझ्या देशात परत जा' असं सांगितले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला असून या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झालीय.
यूकेमधील ओल्डबरी येथील एका उद्यानात एका २० वर्षीय शीख महिलेवर दिवसाढवळ्या दोन पुरूषांनी बलात्कार केला आणि हल्ल्यादरम्यान तिला तुमच्या देशात परत जा असे सांगितले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या आधी टेम रोडजवळील एका भागात हा हल्ला झाला. पोलिसांनी सांगितले की ते या हल्ल्याला वांशिकदृष्ट्या वाढलेला द्वेषपूर्ण गुन्हा मानत आहेत आणि संशयितांचा शोध सुरू केला आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, संशयित दोघेही स्थानिक आहेत. एकाच्या डोक्यावर केस नव्हते आणि त्याने गडद रंगाचा स्वेटशर्ट घातला होता, तर दुसऱ्याने राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला होता. या घटनेमुळे स्थानिक शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे. हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅम एजबॅस्टनच्या खासदार प्रीत कौर गिल यांनी या हल्ल्याचा निषेध केला. हल्लेखोरांनी पीडितेला सांगितले की तू येथे राहत नाही पण खरं हे आहे की ती इथलीच आहे. आपल्या शीख समुदायाला आणि प्रत्येक समुदायाला सुरक्षितेचा अधिकार आहे. ब्रिटनमध्ये वंशवाद आणि महिला द्वेषाला स्थान नाही," असं प्रीत कौर गिल यांनी म्हटलं.
दरम्यान, नुकतीच ५० वर्षीय भारतीय वंशाचे अमेरिकन चंद्र मौली नागामल्लैया यांची क्युबा येथील योर्डानिस कोबोस मार्टिनेझ याने हत्या केली. आरोपीने त्यांच्या मानेवर वार केले, जोपर्यंत त्यांचे डोके शरीरापासून वेगळे झाले नाही. त्यानंतर, त्याने त्यांच्या डोक्यात लाथ मारली आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. घटनेच्या वेळी मृताची पत्नी आणि मुलगा देखील तिथेच होता.
नागमलैय्या यांच्या पत्नी निशा आणि हल्ल्याचा साक्षीदार असलेला १८ वर्षांचा मुलगा गौरव याच्या मदतीसाठी निधी संकलनातून जवळपास २००,००० डॉलर्स जमा झाले आहेत. हे पैसे नागमलैय्या यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि गौरवच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी वापरले जातील.