चीनमध्ये गेल्या आठवड्यात भीषण पूर आला होता. चीनमधील शांक्सी प्रांतात २५ जुलैला महापूराने वेढा घातला होता. अचानक आलेल्या पुरामुळे वुची काउंटीमधील एका सोनाराच्या दुकानात पाणी शिरले आणि त्याच्या दुकानातील थोडे थोडके नव्हे तर वीस एक किलो सोने, हिऱ्याचे दागिने वाहून नेले. लाओफेंग्झियांग या ज्वेलरी शॉप पुराचे पाणी घुसले तेव्हा उघडलेले नव्हते, तरीही पुराचा लोंढा एवढा होता की सगळे दागिने साफ झाले. आता हे दागिने मिळविण्यासाठी चिनी नागरिकांची झुंबड उडू लागली असून चिखलात हे लोक दागिने शोधत सुटले आहेत. पोलिसांनी दागिने मिळाले की ते दुकानदाराला परत करण्याचे आवाहन या लोकांना केले आहे.
हे दागिने दुकानात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये सोन्याच्या चेन, बांगड्या, अंगठ्या, कानातले, पेंडेंट, हिऱ्याच्या अंगठ्या, जेड स्टोनचे तुकडे आणि चांदीचे दागिने होते. हे दागिनेच नाही तर दुकानातील एक तिजोरी देखील या पाण्यात वाहून गेली आहे. या तिजोरीमध्ये नवीन दागिन्यांचा स्टॉक, सोने आणि पैसेही होते. बाजारभावानुसार या साऱ्याची किंमत १ कोटी युआन म्हणजेच सुमारे १२ कोटी रुपये होती.
असे काही झाले की भारतातच केवळ लोकांची झुंबड उडत नाही तर अमेरिका, चीनमध्ये देखील लोक आयता माल हडप करण्यासाठी गोळा होतात. आतापर्यंत सोनाराच्या कर्मचाऱ्यांना व काही चिनी लोकांना १ किलो सोने या चिखलात सापडले आहे. सोनाराचे दुकान वाहून गेल्याची खबर लोकांमध्ये पसरताच लोक मेटल डिटेक्टर देखील घेऊन आले आहेत. अनेकांना हे दागिने सापडले आहेत, परंतू त्यांनी ते परत केलेले नाहीत. काही लोकांनी सापडलेले दागिने परत केले आहेत, असे दुकानदाराचा मुलगा शाओयेने म्हटले आहे.
पाणी आले तेव्हा वीज गेली होती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले. यामुळे दुकानात नेमके काय घडले हे समजू शकलेले नाही. पोलीस आता चिनी नागरिकांना दागिने सापडले असतील तर ते दुकानदाराला परत करा असे सांगत आहेत. तर दुकानदारानेही जर लोकांनी आपल्याकडे हे दागिने जाणूनबुजून ठेवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.