मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. काल पश्चिम नेपाळमधील एका तुरुंगात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षात पाच अल्पवयीन कैद्यांचा मृत्यू झाला. तर हिंसक सरकारविरोधी निदर्शनांमध्ये देशभरातील विविध तुरुंगांमधून ७,००० हून अधिक कैदी पळून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शनांचा फायदा घेत कैद्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, यामुळे मंगळवारपासून अनेक तुरुंगांमध्ये संघर्ष सुरू झाला.
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
पाच बाल कैद्यांचा मृत्यू
मंगळवारी रात्री बांके येथील बैजनाथ ग्रामीण नगरपालिका-३ मधील नौबस्ता प्रादेशिक कारागृहातील नौबस्ता सुधारगृहात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत पाच बाल कैद्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेदरम्यान तुरुंगातील ५८५ कैद्यांपैकी १४९ आणि बालसुधारगृहातील १७६ कैद्यांपैकी ७६ कैदी पळून गेले.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, दिल्लीबाजार तुरुंग (१,१००), चितवन (७००), नख्खू (१,२००), सुनसरीचा झुंपका (१,५७५), कांचनपूर (४५०), कैलाली (६१२), जलेश्वर (५७६), कास्की (७७३), डांग (१२४), जुमला (३६), सोलुखुंबू (८६), गौर (२६०) आणि बझांग (६५) यासह अनेक ठिकाणांहून कैदी पळून गेले आहेत.
दक्षिण नेपाळच्या बागमती प्रांतातील सिंधुलीगढी येथील जिल्हा तुरुंगातून ४३ महिलांसह सर्व ४७१ कैदी पळून गेले. बुधवारी सकाळी कैद्यांनी तुरुंगात आग लावली, पळून जाण्यासाठी मुख्य गेट तोडले.
तुरुंगातून किमान ३६ कैदी पळून गेले
दक्षिण नेपाळमधील नवलपरासी पश्चिम जिल्हा तुरुंगातून ५०० हून अधिक कैदी पळून गेले. दुसऱ्या एका घटनेत, पश्चिम नेपाळच्या डोंगराळ भागात असलेल्या जुमला जिल्ह्यातील चंदनाथ नगरपालिका-६ येथील तुरुंगातून किमान ३६ कैदी पळून गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे १२.०२ वाजता ही घटना घडली. त्यावेळी कैद्यांनी लाकडी दांडक्यांनी तुरुंगाच्या वॉर्डनवर हल्ला केला आणि पळून जाण्यासाठी मुख्य गेट तोडले.