मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याच दिवशी या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली. पण, भारताने त्या दिवसापासूनच कारवाईला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या घरांवर कारवाई केली, पाकिस्तानविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई पाहून आता टीआरएफने यू-टर्न घेतला आहे.
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
टीआरएफ घाबरले आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेने आणखी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये टीआरएफने बैसरन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नाकारले आहे. टीआरएफने आपल्या आधीच्या विधानापासीन यू-टर्न घेत म्हटले आहे की, हल्ल्यानंतर लगेचच कोणीतरी त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले आणि पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करणारी पोस्ट शेअर केली.
दरम्यान, आता टीआरएफने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'पहलगाम घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा यात दावा केला आहे. तर भारतीय सुरक्षा एजन्सींचा असा विश्वास आहे की, वाढता दबाव पाहून पाकिस्तानने अचानक आपली रणनीती बदलली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवादी हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर टीआरएफला त्यांचे विधान बदलण्यास सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या आयएसआयच्या दबावाखाली, टीआरएफने एक नवीन विधान जारी करून यू-टर्न घेतला. दहशतवादी हल्ल्याच्या चार दिवसांनंतर, टीआरएफने त्यांच्या अधिकृत लेटरहेडवर एक निवेदन जारी केले आहे.
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर..."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचं दिसून येते. भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. त्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे असं सांगत भारताला पोकळ धमकीही दिली आहे.
शहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद करावा. भारताच्या कुठल्याही हल्ल्याला आम्ही ताकदीने उत्तर देऊ. पाकिस्तानला शांतता हवी परंतु आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत समजू नका. जर भारताने सिंधु नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला ताकदीने प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीला आम्ही तयार आहोत. परिस्थिती काहीही असली तरी आम्ही सन्मानाशी तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानी सैन्य प्रमुखासमोर त्यांनी हे विधान केले.