सुजय शास्त्री, वृत्तसंपादक
इस्रायलच्या दबावामुळे अमेरिकेने इराणविरोधात उडी घेतली. असे पहिल्यांदाच घडले की, कुणा देशाच्या दबावामुळे अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च करून युद्ध सुरू केले, पण चिवट इराणमुळे हे युद्ध आता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धातून बाहेर पडण्यासंदर्भात विधाने केली आहेत. समजा अमेरिकेने खरोखरीच हल्ले थांबवले तर इराण विरुद्ध इस्रायल असा संघर्ष पुढे चालू राहील. त्याने आखात पेटत राहील.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलदरम्यान सुरू असलेल्या युद्धात मंगळवारी अचानकपणे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याचे कारण सांगताना केंट यांनी इराणवर अमेरिकेने केलेले हल्ले अनावश्यक असून ट्रम्प प्रशासनाने सांगितलेले कारण मनाला पटत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इराणची अणुबॉम्ब निर्मित करण्याएवढी तांत्रिक व शास्त्रीय तयारी नाही. त्यांची क्षमताही नाही. त्यामुळे इराण अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकणार आहे, असा जो बागुलबुवा ट्रम्प प्रशासनाने उभा केला आहे, ते मुळात वास्तवच नाही असे त्यांचे म्हणणे होते. या वास्तवावर आता जवळपास एकमत झालेले आहे.
केंट यांच्या अशा अनपेक्षित राजीनाम्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे प्रशासन थोडे अस्थिर झाले. अस्थिर यासाठी की अमेरिकेतील प्रसार माध्यमांत यावर तुफान चर्चा झाली. सरकारला धारेवर धरले गेले. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या सामरिक विश्वात, व्हाइट हाउस-पेंटागॉन प्रशासनात २० हून अधिक दिवस सुरू असलेले इराणविरोधातील युद्ध नेमके कोणाच्या हितासाठी चालले आहे, यावर गोंधळ, संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे हे युद्ध कुणी सुरू केले? खुद्द ट्रम्प यांनी की, व्हाइट हाउसमधील कडव्या उजव्या गटांनी, की बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमधील झिओनिस्ट सीईओनी की सुपररिच ज्यू भांडवलदारांनी.? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. यांची उत्तरे लगेच मिळणार नाही.
खुद्द ट्रम्प या युद्धांत रुतून गेल्याने ते रोज वेगवेगळी परस्परविरोधी विधाने करत गोंधळलेले दिसतात. शुक्रवारी त्यांनी आखातातील अमेरिकेच्या कारवाया हळूहळू कमी केल्या जातील पण अमेरिकेचे लष्कर तैनात असेल असे वक्तव्य केले आहे. त्यापूर्वी तीन दिवसांपूर्वी त्यांनी होर्मुझमधून होणारी जहाज वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपल्या मित्र देशांपुढे मदतीचे हात पसरले. प्रसंगी ब्रिटनलाही सुनावण्यास कमी केले नाही. नेटो संघटना कुचकामी असल्याचाही त्यांनी आरोप केला. हे सर्व पाहता ट्रम्प यांना जो अनपेक्षित पाठिंबा जगाकडून हवा होता तो त्यांना मिळताना दिसत नाही. भविष्यातही भारत, पाकिस्तानसारखा त्यांचा मित्र 'युद्ध कराच, आम्ही तुमच्यासोबत आहे', असे म्हणू शकत नाही. त्यामुळे हे युद्ध किती दिवस व कोणत्या हेतूसाठी चालवायचा हा महत्त्वाचा मुद्दा अनुत्तरीत राहतो.
राहिली गोष्ट इस्रायलची. इस्रायलसाठी हे युद्ध त्यांच्या 'ग्रेटर इस्रायल' विचारधारणेशी सुसंगत असे आहे. इराणमधील केवळ राजवट बदलून नव्हे तर इराणची अर्थव्यवस्था खिळखिळीत करणे. आणि सामान्य इराणी जनतेला देशोधडीला लावणे असा व्यापक अजेंडा इस्रायलचा आहे. जसे गाझामध्ये बेचिराख केले तसे इराण त्यांना बेचिराख करायचा आहे.
अमेरिका-इस्रायलच्या उद्दिष्टात फरक
सध्याची परिस्थिती पाहता इराणचा आक्रमकपणा ट्रम्प यांना धक्का देणारा होता. सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनेईंना मारल्यानंतर इराणवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल असा ट्रम्प यांचा होरा सपशेल फसला. अली लारिजानीसारख्या महत्त्वाच्या नेत्यालाही ठार मारले तरी इराण गुडघ्यावर येण्यास तयार नाही. अशा वेळी नेमके कुणाला ठार मारून इराण ताब्यात येईल किंवा नेमके काय साध्य झाल्यास आपण स्वतःला विजेता घोषित करू शकतो यावर ट्रम्प प्रशासनात प्रचंड गोंधळ उडालेला दिसतोय. शिवाय दिवसेंदिवस या युद्धात इस्रायलची उद्दिष्टे आणि अमेरिकेचे उद्दिष्टे यात फारकत होताना दिसते.
अरब देशांना वाऱ्यावर सोडले
अमेरिकेचे आखातात जेवढे काही तळ आहेत, तेथे इराणकडून सतत हल्ल्याने ते देश धास्तावले आहेत. त्यांची तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली आहे. या देशांवर इराण सडेतोड हल्ले करेल याची गुप्तचर माहिती अमेरिका या देशांना पोहचवू शकत नसल्याने अरब देश ट्रम्प यांच्यावर नाराज आहे. अमेरिका आम्हाला विश्वासात घेत नाही, असे हे देश म्हणू लागले आहेत.
तेलकिंमती नियंत्रण हाताबाहेर
खामेनेईंना ठार मारल्यानंतर आंतरराष्ट्रीय तेल किंमतीवर अमेरिकेचे नियंत्रण राहील असे ट्रम्प यांना वाटत होते, प्रत्यक्षात तो भ्रम ठरला. इराणने अमेरिका-इस्रायलशी लढताना त्यांच्या राजकीय संरचनेचा पुरेपूर वापर केला. सत्तेतील प्रत्येक थर नष्ट केल्याशिवाय हे युद्ध जिंकता येत नाही हे इराणने आखाती देशांतील हल्ल्यांवरून दाखवले. इराणचे होर्मुझवरील नियंत्रण २० दिवसानंतरही कमी झालेले नाही. साहजिकच त्यांच्या हल्ल्यांमुळे तेलबाजारातील किंमतीवर परिणाम होताना दिसतोय.
ट्रम्प यांची परस्परविरोधी, विसंगत विधाने
ट्रम्प यांनी काही वेळा युद्ध “लवकर संपेल” असे म्हटले, तर दुसरीकडे इराणला नमत नसल्याने त्यांना धमक्या देण्यासही ते विसरत नाही. त्यांनी एकीकडे सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले, पण आमचे पर्याय खुले आहेत, असेही ते म्हणतात. 'जी-७' देशांना त्यांनी गोंजारायचा प्रयत्न केला पण त्यांनी साथ नाकारल्याने त्यांनी 'नेटो'च्या रचनेवर टीका करण्यास सुरूवात केली.
अमेरिकेतील जनमताकडे दुर्लक्ष
या युद्धात अमेरिकेतील जनमत आपल्यामागे असेल असे ट्रम्प यांना वाटत होते. पण तेलाचे वाढलेले दर, महागाई याने अमेरिकेतील त्यांचा मतदार त्यांच्या मागे नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही ट्रम्प यांनी जनमताकडे दुर्लक्ष केलेले दिसते. दुसरे म्हणजे माध्यमांत सतत स्वतःला कणखर, ताकदवान दाखवणे यालाही मर्यादा आलेल्या दिसतात. ट्रम्प थकलेले वाटतात. माध्यमांशी बोलताना अमेरिकेच्या लष्करी धोरणाऐवजी त्यांच्या स्वभावातील जगाला वेठीस धरण्याचा आत्मकेंद्रीपणा डोकावत राहतो. 'मागा' सारख्या चळवळीही ट्रम्प यांच्यापासून दूर गेल्या आहेत.
Web Summary : US-Iran tensions escalate due to Israeli pressure. Trump faces criticism over the war's motives and conflicting statements. Israel aims to weaken Iran, while the US struggles to define its objectives, leaving Arab nations vulnerable and oil prices unstable.
Web Summary : इजरायली दबाव के कारण अमेरिका-ईरान तनाव बढ़ रहा है। ट्रंप युद्ध के उद्देश्यों और विरोधाभासी बयानों को लेकर आलोचना का सामना कर रहे हैं। इजरायल का लक्ष्य ईरान को कमजोर करना है, जबकि अमेरिका अपने उद्देश्यों को परिभाषित करने के लिए संघर्ष कर रहा है, जिससे अरब राष्ट्र कमजोर और तेल की कीमतें अस्थिर हैं।