ढाका : न्यायमूर्ती एस. के. सिन्हा यांची सोमवारी बांगलादेशच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. या मुस्लिम बहुसंख्याक देशात सर्वोच्च न्यायिक पदावर नियुक्त होणारे ते पहिले हिंदू आहेत. सिन्हा हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असल्याने राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्दुल हमीद यांनी त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली. त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ लाभेल. देशाचे सरन्यायाधीश बनणारे ते पहिले बिगरमुस्लिम आहेत. विद्यमान सरन्यायाधीश मुजम्मील हुसैन १६ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. १७ जानेवारी रोजी सिन्हा यांचा शपथविधी होईल. वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येचा खटला, घटनेतील ५ व्या आणि १३ व्या दुरुस्तीबाबतच्या खटल्यासह मैलाचा दगड ठरणारे अनेक निवाडे सिन्हा यांच्या नावावर आहेत. विधि पदवी प्राप्त केल्यानंतर १९७४ मध्ये ते सिल्हेट येथील जिल्हा न्यायालयात वकील म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर उच्च न्यायालय व अपील विभागात त्यांना संधी मिळाली. १९९९ मध्ये त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली, तर २००९ मध्ये ते अपीलीय विभागाचे न्यायमूर्ती बनले. शनिवारी अध्यक्षीय प्रासादात त्यांचा शपथविधी होईल. (वृत्तसंस्था)
बांगलादेशला मिळाले पहिले हिंदू सरन्यायाधीश
By admin | Updated: January 12, 2015 23:56 IST