अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा एफबीआयच्या पथकाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्यावर धाडी टाकल्या. बोल्टन यांच्या घर आणि कार्यालयावर शुक्रवारी या धाडी टाकण्यात आल्या. गोपनीय कागदपत्रासंदर्भातील एका प्रकरणात ही कारवाई केली गेली. मात्र, भारताचे समर्थन करत ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केल्यानंतर ही कारवाई झाल्याने याला राजकीय वास असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात जॉन बोल्टन त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता आणि २०२० मध्ये एक पुस्तकही लिहिले. राजीनामा दिल्यापासूनच ते ट्रम्प यांच्या धोरणांचे टीकाकार बनले.
धाडी टॅरिफवरील टीकेनंतर?
गोपनीय माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर व्हाईट हाऊसने केलेला आहे. याच प्रकरणात एफबीआय आणि गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने या धाडी टाकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पण, दुसरीकडे बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या भारताविरोधातील टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली होती, त्याच्याशीही याचा संबंध जोडला जात आहे.
जॉन बोल्टन टॅरिफबद्दल असं काय बोलले आहेत?
ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर बोलताना बोल्टन एका मुलाखतीत म्हणाले आहेत की, "रशियावर कोणतेही नवी निर्बंध लावले गेले नाहीत. चीन रशियाकडून सर्वाधिक तेल आणि गॅस खरेदी करतो, तरीही चीनवर नवी निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. पण, भारताला वेगळ पाडून लक्ष्य केलं गेलं आहे."
"मला वाटतं की, भारताने रशियाकडून तेल, गॅस खरेदी करू नये, कारण माझं असं मत आहे की, भारत आणि अमेरिकेसाठी हे महत्त्वाचं आहे की, चीनमुळे तयार होणारा धोका ओळखला पाहिजे. चीन आणि रशिया यांच्यातील मैत्री आणि त्यामुळे जगाला निर्माण होणारा धोकाही समजून घेतला पाहिजे", असेही बोल्टन म्हणाले आहेत.
भारत चीन, रशियाजवळ जाईल यांची चिंता वाटतेय
टॅरिफच्या मुद्द्यावर टीका करताना बोल्टन यांनीही असेही म्हटले आहे की, "भारताला एकटं पाडणं आणि त्याच्यावर शिक्षा म्हणून टॅरिफ लादणे, हे अनेक लोकांना असा विचार करायला भाग पाडेल की अमेरिकेने भारताची साथ सोडली आहे. मला चिंता या गोष्टीची आहे की, यामुळे भारत चीन आणि रशियाच्या आणखी जवळ जाईल."
"दुर्दैवाने ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातून जे केले आहे, त्यामुळे भारत आणि इतर देशांसोबत जे अनेक दशकांपासून विश्वासार्हता निर्माण झाली होती, ती कमकुवत होत आहे. हे पुन्हा नीट करण्यासाठी दीर्घकाळ जाईल", असेही बोल्टन म्हणालेले आहेत.