जगभरात लोकप्रिय असलेले आणि "दयाळू न्यायाधीश" म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
न्यायाधीश कॅप्रियो हे केवळ कायद्याच्या पुस्तकानुसारच नव्हे, तर माणुसकी आणि दयेच्या भावनेतून निकाल देण्यासाठी प्रसिद्ध होते. याच कारणामुळे त्यांना सामान्य जनतेमध्ये प्रचंड प्रेम मिळाले आणि ते अमेरिकेतील सर्वात आवडते न्यायाधीश मानले जात होते.
८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासत्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर जाहीर केलेल्या निवेदनानुसार, "न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे कर्करोगाविरुद्धच्या दीर्घ लढ्यानंतर निधन झाले आहे. ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला." या निवेदनात पुढे म्हटले आहे की, "त्यांची करुणा, नम्रता आणि लोकांवरील अटूट विश्वासामुळे ते सगळ्यांचेच प्रिय होते. न्यायाधीश कॅप्रियो यांनी आपल्या कामातून लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला. त्यांची प्रेमळ वागणूक, विनोदबुद्धी आणि दयाळूपणाने प्रत्येकावर एक अमिट छाप सोडली."
निवेदनात असेही म्हटले आहे की, "त्यांना केवळ एक सन्मानित न्यायाधीश म्हणूनच नव्हे, तर एक समर्पित पती, वडील, आजोबा, पणजोबा आणि मित्र म्हणूनही नेहमी लक्षात ठेवले जाईल. त्यांनी केलेल्या असंख्य दयाळू कृत्यांमध्ये त्यांची प्रतिमा जिवंत राहील. त्यांच्या सन्मानार्थ, आपण सर्वांनी जगात आणखी थोडी करुणा आणण्याचा प्रयत्न करूया, जसे ते नेहमी करत होते."
२०२३मध्ये निवृत्त झाले होते कॅप्रियो'न्यूयॉर्क पोस्ट'च्या अहवालानुसार, न्यायाधीश कॅप्रियो १९८५मध्ये न्यायाधीश बनले आणि २०२३ मध्ये ते निवृत्त झाले. डिसेंबर २०२३मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते.
निधनाच्या २४ तास आधी त्यांची शेवटची पोस्टविशेष म्हणजे, त्यांच्या निधनाच्या सुमारे २४ तास आधी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लोकांच्या प्रार्थना, प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. रुग्णालयात कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांनी सर्वांचे आभार मानले होते.