इस्त्रायलच्या तेल अवीव शहरात ३ बसमध्ये एका पाठोपाठ एक जोरदार स्फोट झालेत. या स्फोटात जीवितहानी होण्याची माहिती नाही. हा संशयित दहशतवादी हल्ला असू शकतो असं इस्त्रायली पोलिसांचा संशय आहे. हे स्फोट याम परिसरात झाले आहेत. पोलिसांनी २ अन्य बसमधील बॉम्ब निष्क्रिय केले. या हल्ल्यानंतर देशातील सर्व बस, ट्रेन, मेट्रो सेवा बंद करण्याची घोषणा परिवहन मंत्री मीरी रेगव यांनी केली आहे.
इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी आयडीएफला आदेश दिलेत की, वेस्ट बँक इथल्या शरणार्थी शिबिराजवळ सक्रियता वाढवावी. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आयडीएफ आणि शिन बैट संयुक्तपणे काम करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पार्किंगला उभ्या असणाऱ्या एका बसला आग लागलेली दिसते. या विस्फोटक साहित्यात टायमर लावण्यात आले होते. या साहित्यावर काही लिहिले होते. Revenge Threat असा उल्लेख स्फोटकांवर होता. हा हल्ला कुणी केला, त्यात किती लोक सहभागी होते याचा तपास घेतला जात आहे अशी माहिती तेल अवीव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हेम सर्गारोफ यांनी दिली.
तर एका टेलीग्रॅम चॅनेलवर निवेदन जारी करण्यात आलं आहे. आमच्या शहिदांच्या बलिदानाला आम्ही विसरणार नाही. हा बदला आहे. हा चॅनेल हमासच्या तथाकथित तुल्कारेम बटालियनचा आहे. मात्र त्यात थेट या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून या घटनेची सातत्याने माहिती घेण्यात येत आहे. त्यांनी देशातील सुरक्षेचा आढावाही घेतला आहे.
पेजर अटॅक काय होता?
लेबनान आणि सीरियाच्या काही भागात मागील वर्षी सीरियल पेजर स्फोट झाले होते. या स्फोटात पेजरमधून सुरुवातीला काही सेकंद बीपचा आवाज ऐकायला आला. काही पेजर खिशातच पेटले, तर काहींनी बीपचा आवाज ऐकून बॅग, खिशातून बाहेर काढला तेव्हा त्यात स्फोट झाला. काही लोकांच्या हातातच स्फोट झाला होता. या स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला होता त्यात लहान मुलीचाही समावेश होता. स्फोटामुळे ४ हजार लोकांना गंभीर आणि किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या होत्या. अनेकांचे हात गेले होते. ५०० हून अधिक लोकांना त्यांचे डोळे गमवावे लागले. मृतांमध्ये लेबनानी खासदारांचा मुलगाही होता. लेबनानमध्ये झालेल्या पेजर हल्ल्याची जबाबदारी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी घेतली होती. इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात पेजर हल्ल्याचं मिशन हाती घेतले होते. त्याचाच आता बदला घेतला का याचा शोध इस्त्रायली पोलीस घेत आहेत.