पाकिस्तानच्या प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानच्या एका कमांडरचा नुकताच बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यात क्वाडकॉप्टर (ड्रोन) हाताळत असताना हा स्फोट झाला. कमांडरचे नाव यासीन उर्फ अब्दुल्ला असे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, यासीन अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर जिल्ह्यातील तिराह खोऱ्यात एक क्वाडकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. याचवेळी बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटात त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन आणि त्याच्या गटाने २४ मे रोजीच TTP मध्ये औपचारिकरित्या प्रवेश केला होता. यासीन हा तिराह प्रदेशात संघटनेच्या कारवायांचे नेतृत्व करत होता. हा परिसर सुरक्षा दले आणि TTP, तसेच लष्कर-ए-इस्लाम आणि अंसार-उल-इस्लाम यांसारख्या इतर दहशतवादी गटांमधील संघर्षाचे प्रमुख केंद्र बनला आहे.
तिराह खोऱ्यातील वाढता दहशतवादया प्रदेशात गेल्या काही काळापासून दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तानी सैन्याने २२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानी सैन्य हा परिसर दहशतवादमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे तिराहमध्ये विशेष मोहिमा राबवून दहशतवादी तळ आणि शस्त्रास्त्रांचे साठे नष्ट केले जात आहेत.
तहरीक-ए-तालिबान (TTP) म्हणजे काय?TTP ही पाकिस्तानमधील एक दहशतवादी संघटना आहे. २००७ साली बैतुल्लाह महसूद याने या संघटनेची स्थापना केली होती. याची मुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर आहेत. अंदाजानुसार, TTP मध्ये ३०,००० ते ३५,००० सदस्य असू शकतात.