कतारची राजधानी दोहा येथे एक मोठे संमेलन होत आहे. अरब इस्लामिक शिखर संमेलनात ५० हून अधिक मुस्लीम देश सहभागी होणार आहेत. दोहा येथे इस्रायली हल्ल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम देश एकवटणार आहेत. त्यामुळे या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे संमेलन ना केवळ इस्रायल, तर अमेरिकेचीही चिंता वाढवणारे आहे.
गाझा येथील इस्रायली हल्ल्यामुळे आधीच अनेक मुस्लीम देश नाराज आहेत. त्यातच दोहा इथल्या हल्ल्यानं आणखी वातावरण चिघळले आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानचे नाव घेऊन इस्रायलने संतप्त भूमिका व्यक्त केली, त्यामुळे इतर देशांनीही धडकी घेतली आहे. इस्रायली हल्ल्याने अमेरिकेचे समर्थन करणाऱ्या अरब देशांच्या एकजुटीलाही बाधा निर्माण झाली आहे. हे आपत्कालीन शिखर संमेलन अरब लीग आणि इस्लामिक सहयोग संघटनेच्या सदस्यांना एकाच व्यासपीठावर आणणारे आहे. कतार एकटा नाही, अरब आणि इस्लामी देश त्याच्यासोबत उभे आहे असा संदेश अरब लीगचे महासचिव अहमद अबुल गैन यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिले.
नेतन्याहू यांचा दबाव कायम
९ सप्टेंबरच्या हल्ल्याचा निषेधाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारवर हमास नेत्यांच्या हजेरीवरून दबाव वाढवला आहे. हमासच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अन्यथा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवा असा इशारा त्यांनी कतारला दिला आहे. कतार जवळपास २ वर्ष गाझा युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हल्ल्यानंतर कतारने इस्रायलवर आरोप केला आहे. इस्रायल शांतता प्रस्थापित करण्याला बाधा आणत असून नेतन्याहू हिंसाचार पसरवत आहेत असा आरोप कतारने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प नाराज
दरम्यान, कतारवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आहेत. कतारला जवळचा मित्र म्हणत तो शांततेसाठी प्रयत्न करत होता असं ट्रम्प यांनी म्हटलं. या हल्ल्यानंतर कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी त्यांच्या भूमीवर पुन्हा अशी घटना घडायला नको असं म्हटलं आहे. तर कतारने त्यांच्या इथून हमासचे नेते हटवायला हवेत अशी मागणी इस्रायलने केली आहे.