जपानमधील अकियो ही ८१ वर्षांची एक वृद्ध महिला. त्यांना नुकतंच दुसऱ्यांदा जपानच्या महिला तुरुंगात टाकण्यात आलं. कारण काय? - तर त्यांनी आधी एक चारीचा गुन्हा केला होता. त्यानंतर त्यांनी तसल्याच प्रकारचा दुसरा गुन्हा केला. तुरुंगात जाणं ही कोणाहीसाठी तशी नामुश्कीची आणि लाजिरवाणी गोष्ट. अकियो आजी मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. पुन्हा तुरुंगात डांबल्यावर त्यांना कोण आनंद झाला! आपल्यावरचा गुन्हा सिद्ध व्हावा आणि पोलिसांनी, न्यायालयानं आपल्याला तुरुंगात टाकावं हीच त्यांची इच्छा होती! त्यामुळे त्यांनी स्वत:हूनच तो गुन्हा केला होता. - कारण काय?, का त्यांना तुरुंगात जायचं होतं?, यासंदर्भातलं वास्तव अतिशय भयानक आणि समाजाच्या डोळ्यांत अंजन टाकणारं आहे.
जपानसारख्या देशांत वृद्धांची, म्हाताऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आयुष्याच्या संध्याकाळी या लोकांना अनेक समस्यांना आणि त्यातही एकटेपणाला सामोरं जावं लागतं. या वयात शरीर थकलेलं असतं. हिंडणं-फिरणं बऱ्यापैकी बंद झालेलं असतं. जोडीला असंख्य आजारपणांनी छळलेलं असतं. जोडीला कोणी नसतं, बोलायला, तुमची सुख-दु:खं वाटून घ्यायला कोणी नसतं. बऱ्याचदा मुलांनाही आपल्याच वृद्ध आई-बापांची अडगळ झालेली असते. अशा वेळी करायचं काय? वृद्ध अकियो आजींनाही एकटेपणाच्या याच समस्येनं घेरलेलं होतं. मुलाला वृद्ध आईची अडगळ नको होती. असह्य झाल्यावर शेवटी अकियो आजींनाही घरातून बाहेर पडावंच लागलं. पण घराबाहेर पडल्यावर त्यांची अवस्था आणखीच बिकट झाली. घरात मुलानं राहणं अशक्य केलं असलं, तरी निदान दोन वेळच्या जेवणाची सोय होत होती. भुकेल्या पोटानं शेवटी अकियो आजींना चोरी करायलाच लावली. अर्थातच त्यांची चोरी पकडली गेली आणि आजींना तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथे आल्यावर इतके सारे कैदी, इतक्या साऱ्या समवयीन आणि समदु:खी बायका पाहिल्यावर त्यांना फार आनंद झाला. त्यांचा वेळही मजेत आणि मुख्य म्हणजे लोकांमध्ये जाऊ लागला. शिवाय राहण्याची आणि जेवणाखाण्याची सोय झाली ती वेगळीच. घरापेक्षा इथलं वातावरण तर दसपटीनं चांगलं होतं.
शिक्षा संपल्यानंतर तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. काही काळ त्यांनी पुन्हा एकट्यानं जगून पाहण्याचा प्रयत्न केला, पण हे एकटेपण खायला लागल्यावर आणि पेन्शनवर गुजारा होणं अशक्य झाल्यावर त्यांनी मुद्दाम पुन्हा एक गुन्हा केला. जपानच्या ‘तोचिगो’ या सर्वांत मोठ्या महिला तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं. या तुरुंगात पाचशे महिला कैदी आहेत. अकियो आजी म्हणतात, माझी आर्थिक परिस्थिती चांगली असती आणि एकटेपणानं मला छळलं नसतं, तर गुन्हा करण्याचा, तुरुंगात जाण्याचा विचार मी कधीच केला नसता आणि हो, मला एकट्यानं अज्ञातवासात मरायचं पण नाही. म्हणूनच, मी गुन्हा केला आणि तुरुंगात, ‘माणसांत’ आले !
मात्र अकियो आजींच्या कहाणीपेक्षाही वेदनादायी गोष्ट म्हणजे जपानमध्ये असे अनेक वृद्ध आहेत, ज्यांना एकटेपणानं छळलं आहे, आपल्याच मुलांनी त्यांना टाकलं आहे, त्यामुळेच मुद्दाम गुन्हे करून ते तुरुंगात जाताहेत. आर्थिक कारणापेक्षाही त्यांची सर्वांत मोठी प्रेरणा हीच. तुरुंगात आपला एकटेपणा दूर होईल. निदान बोलायला, आपल्याला समजून घेणारं तरी तिथे कोणीतरी नक्कीच असेल...