Zimbabwe News : एखाद्या अनोळखी ठिकाणी एकट्याने जायला मोठ्यांनाही घाबरायला होतं. घनदाट जंगलात एकट्याने राहण्याचा विचारही सोडून द्या. जंगलात वाघ-सिंहासारखे अनेक हिंस्र प्राणी असतात, जे एका क्षणात जीव घेऊ शकतात. पण, आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत, जी ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. झिम्बाब्वे देशात ही धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षीय मुलगा चुकून घनदाट जंगलात पोहोचला अन् पाच दिवस जीव मुठीत ठेवून मृत्यूशी झुंज दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, टिनोतेंडा पुंडू नावाचा आठ वर्षीय मुलगा उत्तर झिम्बाब्वेतील एका गावात राहतो. एके दिवशी तो चुकून घनदाट जंगलात पोहोचला. जंगलात चालत चालत तो इतक्या आत गेला की, त्याला परत येण्याचा रस्ता सापडत नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, पुंडू प्रत्यक्ष जंगलात नाही, तर सिंहाच्या अभयारण्यात गेला होता. आहे. पुंडू हिंसाच्या तावडीत सापडला असता, तर त्याचे बरे वाईटही झाले असते.
विशेष म्हणजे, पुंडूचे गाव दुष्काळाने होरपळले आहे. पुंडूला लहानपणापासून पाण्याची जमीन कशी ओळखायची आणि त्यातून पाणी बाहेक कसे काढायचे, याची शिकवण मिळालेली होती. याचाच फायदा पुंडूला जंगलात झाला. त्याने नदीचे पात्र शोधले अन् तिथे काठीच्या सहाय्याने खोदकाम करत पाणी शोधले. याच पाण्याने त्याची तहान भागवली आणि त्याला जिवंत ठेवले.
पुंडू 27 डिसेंबर रोजी गावातून बेपत्ता झाला होता. गावकऱ्यांनी ढोल वाजवत त्याचा शोध सुरू केला. पुंडू ढोलच्या आवाजाच्या दिशेने येईल, अशी त्यांना आशा होती. मात्र ग्रामस्थांचा हा प्रयत्न फसला. 8 वर्षांचा पुंडू चालत चालत गावापासून 50 किलोमीटर दूर गेला होता अन् गावकरी गावाजवळ शोध घेत होते. भुकेने व्याकुळ झालेल्या पुंडूने रानफळे खावून भूक भागवली. अवघ्या आठ वर्षांचा पुंडू इतका हुशार होता की, तो सिंहापासून वाचण्यासाठी उंचीवर झोपला.
पाच दिवसांनंतर पुंडूला पार्क रेंजरच्या गाडीचा आवाज ऐकू आला, तो गाडीच्या दिशेने धावला, पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती. सुदैवाने रेंजला नंतर लहान मुलाच्या पायाचे ठसे पाहिले आणि तो परतला. अखेर पाच दिवसांनंतर पुंडू रेंजरला सुखरुप सापडला. इतके दिवस सिंहांनी भरलेल्या जंगलात आठ वर्षीय पुंडू एकटा राहिला आणि जिवंत घरी परतला. त्याच्या या शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.