रोम : मध्य इटलीला रविवारी पहाटे ६.६ रिच्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटले आहे. या भूकंपात कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु ११ जण जखमी झाले. या भूकंपाचा धक्का रोमपासून व्हेनिसपर्यंत जाणवला. त्याचा केंद्र बिंदू नोर्सिया या छोट्या गावाच्या उत्तरेला सहा किलोमीटर खोलीवर आढळला. अवघ्या चारच दिवसांपूर्वी मध्य इटलीला ५.५ व ६.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. भूकंपासाठी कुख्यात असलेल्या भागात गेल्या २४ आॅगस्ट रोजी भूकंपाचा धक्का बसून जवळपास ३०० लोक ठार झाले होते.नोर्सिया गावातील लोक मोठ्या प्रमाणावर तेथून आधीच निघून गेले असून रविवारच्या भूकंपाचे संकेत कुत्र्यांच्या भूंकण्यातून मिळाले होते. रविवारच्या भूकंपात इमारतीच्या ढिगाऱ्याखालून नऊ लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था)
मध्य इटलीला भूकंपाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 07:28 IST