तुर्कीच्या वायव्य भागातील बालिकेसिर प्रांतात रविवारी संध्याकाळी ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भूकंपाचे केंद्र सिंदिरगी शहराजवळ होते. या हादऱ्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून, एका ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, २९ जण जखमी झाल्याची माहिती तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (AFAD) दिली आहे.
भूकंप स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.५३ वाजता झाला आणि त्याचे धक्के सुमारे २०० किलोमीटर दूर असलेल्या इस्तंबूलपर्यंत जाणवले. १६ दशलक्षहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात देखील हादऱ्यांची तीव्रता जाणवली.
एएफएडीच्या माहितीनुसार, मुख्य भूकंपानंतर अनेक आफ्टरशॉक्स (भूकंपानंतरचे छोटे धक्के) जाणवले, त्यातील सर्वाधिक तीव्रता ४.६ रिश्टर स्केल होती. नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
या भूकंपाचे धक्के बालिकेसिरसह मनिसा, इझमीर, उसाक आणि बुर्सा या शेजारच्या प्रांतांमध्येही जाणवले. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून, विविध प्रांतीय कार्यालयांतून बचावपथके आणि आपत्कालीन वाहने तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. एएफएडीने सांगितले की, आतापर्यंत ३.० पेक्षा जास्त तीव्रतेचे सात आफ्टरशॉक्स नोंदवले गेले आहेत. बचाव आणि मदत कार्य सुरु असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.