दुबई: इराण-इस्रायल युद्धाचा वणवा आता आखाती देशांमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. सोमवारी सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात एका ड्रोनने धडक दिल्याने इंधनाच्या टाकीचा भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे संपूर्ण दुबईत खळबळ उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे तातडीने थांबवली आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे दुबईच्या आकाशात एक संशयास्पद ड्रोन घोंघावताना दिसला. काही क्षणांतच हा ड्रोन विमानतळाच्या बाहेरील बाजूस असलेल्या फ्युएल टँकवर जाऊन आदळला. धडक होताच मोठा आवाज होऊन परिसरात आगीचे लोळ उठले. सुदैवाने, दुबई सिव्हिल डिफेन्सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही एकमेव दिलासादायक बाब आहे.
विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा
या हल्ल्यानंतर दुबई सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. "प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. जोपर्यंत सुरक्षा यंत्रणांकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत एकही विमान धावपट्टीवरून उडणार नाही," असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना विमानतळाकडे न येण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपल्या फ्लाईटचे अपडेट्स ऑनलाईन तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाच दिवसांत दुसरा मोठा हल्ला
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसांतील हा दुबईवरील दुसरा मोठा ड्रोन हल्ला आहे. पाच दिवसांपूर्वीच झालेल्या एका अशाच हल्ल्यात एका भारतीयासह चार जण जखमी झाले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. दुबईसारख्या व्यापारी आणि पर्यटन केंद्राला लक्ष्य केले जात असल्याने आता जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले आहेत.
भारतीय प्रवाशांची चिंता वाढली
दुबई हे भारतीयांसाठी एक महत्त्वाचे ट्रान्झिट हब आहे. हजारो भारतीय दररोज या विमानतळावरून ये-जा करतात. उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक भारतीय प्रवासी विमानतळावर आणि हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या कंपन्यांकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
Web Summary : A drone attack near Dubai International Airport caused a fuel tank explosion, halting flights. No casualties were reported. This is the second attack in five days amid rising Middle East tensions, raising global concerns for travelers.
Web Summary : दुबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के पास ड्रोन हमले से ईंधन टैंक में विस्फोट हो गया, जिससे उड़ानें रोक दी गईं। कोई हताहत नहीं हुआ। मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच पांच दिनों में यह दूसरा हमला है, जिससे यात्रियों के लिए वैश्विक चिंता बढ़ गई है।