अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे.
रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जगभरातील विविध देश आमच्याकडून जेवढा कर वसूल करत आहेत. त्याच्या केवळ निम्मं टॅरिफ आम्ही त्या देशांकडून घेणार आहोत. त्यामुळे हे टॅरिफ पूर्णपणे रेसिप्रोकल नसतील. वाटलं असतं तर मी असं करू शकलो असतो. मात्र बऱ्याच देशांसाठी हे जड गेलं असतं. त्यामुळे आम्ही असं करू इच्छित नव्हतो.
दरम्यान, कुठल्या देशाकडून किती टॅरिफ वसूल केलं जाईल, याचीही घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून ३४ टक्के, युरोपियन युनियनकडून २० टक्के, जपानकडून २४ टक्के, दक्षिण कोरियाकडून २५ टक्के, स्वित्झर्लंडकडून ३१ टक्के, युनायटेड किंग्डमकडून १० टक्के, तैवानकडून ३२ टक्के, मलेशियाकडून २४ टक्के आणि भारताकडून २६ टक्के टॅरिफ वसूल करणार आहे.