कतारमधील हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर अत्यंत नाराज दिसत आहेत. ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्यासंदर्भात अपशब्दही वापरले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलताना ते म्हणाले, नेतन्याहू आपल्याला त्रास देत आहेत. मात्र असे असले तरी, सार्वजनिकरित्या त्यांनी असेही स्पष्ट केले की, ते नेतन्याहू यांच्याशी संबंध तोडणार नाहीत.
नेतन्याहूंवर नाखूश आहेत ट्रम्प - वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, ट्रम्प नुकतेच आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना म्हणाले की, आपण बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर नाराज आहोत. हमासवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासह वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याच महिन्याच्या सुरुवातीला इजरायलने दोहा येथील एका इमारतीवर बॉम्बहल्ला करून हमासच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले, या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात अमेरिकेचे म्हणणे आहे की, त्यांना या हल्ल्याची पूर्वकल्पना नव्हती.
कतारवरील हल्ल्यानंतर अमेरिकेनं दिली प्रतिक्रिया -अमेरिकेने म्हटले आहे की, आपल्याला या हल्ल्याची माहीती मिळाली तेव्हा हा हल्ला थांबवणे थांबवणे अशक्य होते. तथापि, अमेरिकन न्यूज वेबसाइट Axios ने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ट्रम्प प्रशासनाला या हल्ल्याची आधीच माहिती होती. दरम्यान, या हल्ल्यानंतर ट्रम्प आणि वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी कतारच्या पंतप्रधानांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इजरायल आणि कतारचा दौरा केला. यावेळी, इजरायल पुन्हा कतारच्या भूमीवर हल्ला करणार नाही, असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले.
पुढच्याच आठवड्यात ट्रम्प-नेतन्याहू भेट -बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी (17 सप्टेंबर 2025) सांगितले की, त्यांना पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी, कतारमधील हमास नेत्यांवरील हल्ल्यानंतर आपण ट्रम्प यांच्याशी अनेक वेळ फोनवरून संवाद साधला आणि संभाषण चांगले झाले, असेही नेतन्याहू म्हणाले होते. दरम्यान, ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी, हमाससोबत करार करण्यासाठी इजरायलवर सार्वजनिक दबाव टाकण्यास नकार दिला आहे.