Donald Trump Illegal Immigrants: गेल्या आठवड्यात अमेरिकेतील टेक्सासमधील डलास येथे भारतीय वंशाच्या चंद्र मौली नागमल्लैया यांच्या निर्घृण हत्येने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. ज्या पद्धतीने नागमल्लैया यांची हत्या करण्यात आली त्यामुळे सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नागमल्लैया यांच्या निर्घृण हत्येवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना ट्रम्प यांनी दिल्या आहेत. तसेच देशातील बेकायदेशीर स्थलांतर करुन आलेल्यांविषयी मवाळ दृष्टिकोन ठेवण्याची वेळ आता संपली असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
क्युबन नागरिकाने एका भारतीय नागरिकाची हत्या केल्यानंतर अमेरिकेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. टेक्सासमधील डलास येथे एका क्युबन स्थलांतरिताने भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैया यांची हत्या केली. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी याच घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी अमेरिका पुन्हा सुरक्षित करण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रशासन बेकायदेशीर स्थलांतर केलेल्या गुन्हेगारांसोबत सौम्य वागणार नाही असे सांगितले.
"टेक्सासमधील डलास येथील प्रतिष्ठित व्यक्ती चंद्रा नागमल्लैया यांच्या हत्येच्या भयानक बातमीची मला जाणीव आहे. क्युबातील एका बेकायदेशीर परदेशी व्यक्तीने त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर त्यांचा क्रूरपणे शिरच्छेद केला, जे आपल्या देशात कधीही घडायला नको होते. आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल. या माणसावर बाल शोषण, कार चोरी आणि तुरुंगवासासारख्या गुन्ह्यांसाठी यापूर्वी अटक करण्यात आली आहे. पण जो बायडेन यांच्या काळात त्याला आपल्या मायदेशी परत सोडण्यात आले. पण क्युबाला त्यांच्या देशात असा दुष्ट माणूस नको होता. खात्री बाळगा, माझ्या प्रशासनात या बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांवर सौम्य वागण्याची वेळ आता संपली आहे! होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम, अॅटर्नी जनरल पाम बोंडी, बॉर्डर झार टॉम होमन आणि माझ्या प्रशासनातील इतर अनेक जण अमेरिकेला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत. आमच्या ताब्यात असलेल्या या गुन्हेगारावर कायद्याच्या पूर्ण मर्यादेपर्यंत खटला चालवला जाईल. त्याच्यावर खूनाचा आरोप लावला जाईल," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, डलासमध्ये भारतीय वंशाचे हॉटेल मॅनेजर चंद्रमौली नागमल्लैय्या यांची हत्या करण्यात आली होती. नागामल्लैय्या यांची हत्या योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ याने चाकूने वार करून केली. ५० वर्षीय नागामल्लैय्या डाउनटाउन सूट्स नावाच्या हॉटेलमध्ये काम करत होते. क्यूबाचा नागरिक असलेल्या योर्डानिस कोबोस-मार्टिनेझही तिथेच काम करत होता. त्याने नागामल्लैय्या यांचे शीर धडावेगळे करुन ते कचऱ्याच्या डब्यात टाकले होते. तो नागामल्लैय्या यांचे डोके शरीरापासून वेगळे होईपर्यंत त्यांच्यावर हल्ला करत राहिला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी आमि मुलगा तिथे असतानाच हा सगळा प्रकार घडला.