वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर आता जोवर भारत अमेरिकेसोबतचा वाद सोडवत नाही तोवर भारतासोबत कोणत्याही प्रकारची व्यापारावरील चर्चा होणार नाही, अशी धमकी दिली आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला भारताने काहीच प्रत्यूत्तर न दिल्याने ट्रम्प यांचा तिळपापड होऊ लागला आहे.
अमेरिकेने चीनवर टॅरिफ लादलेले तेव्हा चीननेही अमेरिकेवर लादले होते. मग पुन्हा अमेरिकेने, मग पुन्हा चीनने असे प्रत्यूत्तर देणे सुरुच होते. परंतू भारताने ट्रम्प यांच्या घोषणेवर काहीच हालचाल नोंदविली नाही. यामुळे ट्रम्प यांना रहावत नाहीय. एएनआयने विचारलेल्या प्रश्नात ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करारावर चर्चा करण्यास ट्रम्प यांनी नकार दिला आहे.
जोवर याबाबतचे वाद सोडविले जात नाहीत, तोवर भारतासोबत कोणतीही व्यापारी चर्चा केली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्याचा कार्यकारी आदेश जारी केला आहे. यामुळे एकूण कर आता ५० टक्के होणार आहे. सुरुवातीचा २५ टक्के कर ७ ऑगस्टपासून लागू झाला आहे. तर पुढचा २५ टक्के कर हा २१ दिवसांत लागू केला जाणार आहे. ७ ऑगस्टपासून भारतातून निघालेल्या व हा माल जेव्हा अमेरिकेच्या बंदरांमध्ये प्रवेश करेल तेव्हा सर्व भारतीय वस्तूंवर हा कर लावला जाणार आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे, भारत रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसे देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. हीच अमेरिका रशियाकडून युरेनियम, अन्नधान्य, केमिकल खरेदी करत आहे. भारताने अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी भारत अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे म्हटले आहे.