Donald Trump on India Tariff Latest news: "रशियाच्या शस्त्रांमुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत, याच्याशी त्यांना (भारत) काही घेणं-देणं नाही", असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेमध्ये पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफमध्ये भरपूर वाढ करणार असल्याचा इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री एक ट्विट केले आहे. ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या तेलाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भारत प्रचंड नफाही यातून मिळवत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तेल विकून भारत नफाही कमवत आहे -ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारत रशियाकडून फक्त तेल खरेदी करत आहे, इतकंच नाही; तर त्या तेलातील मोठा हिस्सा खुल्या बाजारात विकून भरपूर नफाही कमवत आहे."
"त्यांना (भारत) या गोष्टीशी काही देणं-घेणं नाही की, युक्रेनमध्ये रशियाच्या वॉर मशीनमुळे किती लोक मारले जात आहेत. याच कारणामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
यापूर्वी ३० जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आणि त्यासंदर्भातील कार्यकारी निर्णयावर स्वाक्षरीही केली आहे. त्यानंतर आता नव्याने टॅरिफ वाढवण्याबद्दल त्यांनी विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही महिन्यांपासून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे, असे म्हणत आहेत. रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यास भारतावर दंडही आकारणार असेही त्यांनी जाहीर केले आहे. आता ट्रम्प यांनी भारत रशियाकडून खरेदी केलेलं तेल खुल्या बाजारात विकून नफा कमवत असल्याचा आरोप केला आहे.