Donald Trump airspace breach: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील नो-फ्लाइंग झोन रिसॉर्टवरून तीन विमाने अचानक उडताना दिसली. हा प्रकार घडल्यानंतर लगेचच अमेरिकन सुरक्षा एजन्सी तातडीने सक्रिय झाल्या आहेत. ही विमाने ट्रम्प यांच्या रिसॉर्टवरून गेलीच कशी याबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच, या तपासासाठी यूएस एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने हवाई क्षेत्रात F-16 विमाने पाठवली आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, F-16 लढाऊ विमानांनी अग्निबाण सोडून त्या तीन नागरी विमानांना आपल्या फ्लाईंग झोनमधून बाहेर हाकलून लावले. या ३ नागरी विमानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टवरील हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार, या विमानांनी सकाळी ११.०५, दुपारी १२.१० आणि दुपारी १२.५० वाजता असे तीन वेळा नियमांचे उल्लंघन केले. ही विमाने नो फ्लाईंग असलेल्या बीचजवळील हवाई हद्दीवरून का उडत होती हे अद्यापही कळलेले नाही. पण गेल्या काही आठवड्यात अशा घटना अनेक वेळा घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक वेबसाइट 'पाम बीच पोस्ट' नुसार, ट्रम्प जेव्हा मार-ए-लागो रिसॉर्टवर आले होते त्यावेळी हा प्रकार घडला. १५ फेब्रुवारीला दोन वेळा तर १७ फेब्रुवारीला एकदा या हवाई क्षेत्रात नियमांचे उल्लंघन झाले होते. वेलिंग्टनच्या वरील हवाई क्षेत्रात F-16 लढाऊ विमाने तैनात केल्याचे वृत्त आहे. तसेच १८ फेब्रुवारी २०२५ ला NORAD ने पाम बीचवर एक नागरी विमान उडत असल्याचीही माहिती पुरवली होती.
आयरिश स्टारच्या वृत्तानुसार, एफ-१६ विमानांनी त्या विमानांना परिसरातून हाकलून लावल्यानंतर ट्रम्प रिसॉर्टमध्ये पोहोचले. ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये काही गुप्त कागदपत्रे ठेवण्यात आली होती, जी एफबीआयने जप्त केली. पण नंतर, ट्रम्प यांना ती कागदपत्रे परत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.