न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सून व्हेनेसा ट्रम्प यांना सोमवारी एका संशयास्पद लिफाफ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डोनाल्ड ट्रम्प यांचे पूत्र आणि व्हेनेसा यांचे पती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या मॅनहटन येथील घराच्या पत्त्यावर हा व्हिडिओ पाठवण्यात आला होता. व्हेनेसा यांनी हा लिफाफा उघडला तेव्हा त्यामध्ये सफेद रंगाची पावडर आढळून आली. त्यामुळे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा लगेच सतर्क झाल्या. सुरक्षारक्षकांडून लिफाफा उघडताना त्याठिकाणी हजर असणाऱ्या दोन व्यक्तींना आणि व्हेनेसा यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासणीनंतर या पावडरमुळे त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले.डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. आजच्या भीतीदायक घटनेनंतर व्हेनेसा आणि माझी मुलं सुरक्षित आहेत. काही लोक घृणास्पद पद्धतीने आपला विरोध व्यक्त करत आहेत, असे त्यांनी म्हटले. तर व्हेनेसा ट्रम्प यांनी या घटनेनंतर तत्परता दाखवणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले. तर दुसरीकडे ट्रम्प यांची कन्या इव्हांका यांनीही व्हेनेसा यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मी अशावेळी व्हेनेसासोबत असायला पाहिजे होतं. कोणालाही अशा पद्धतीने घाबरवणे योग्य नसल्याचे इव्हांका यांनी सांगितले.
'तो' लिफाफा उघडल्यानंतर ट्रम्प यांच्या सूनबाईंना जावे लागले रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 09:19 IST