वॉशिंग्टन : इराकी सुरक्षा सैनिकांना स्वत:च्या बळावर दहशतवाद्यांनी जिंकलेला प्रदेश पुन्हा मिळविणे कठीण जाईल, असे अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. अमेरिकी लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल मार्टिन डेम्पसे यांनी इराकमध्ये तैनात केलेल्या अमेरिकन सल्लागारांच्या मताच्या आधारावर हा कौल दिला आहे. इराकी फौजा बगदादचे संरक्षण करतील; पण दहशतवाद्यांनी जिंकलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे त्यांना कठीण जाणार आहे. अल काईदाचीच एक शाखा असणाऱ्या आयएसआयएस या सुन्नी दहशतवादी संघटनेने इराकचा मोठा भाग गिळंकृत केला असून, शिया पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या इराकी सैनिकांनी दहशतवादी येताच ठाणी रिकामी करून दिल्याने फारशी यातायात न करताच दहशतवाद्यांच्या हाती इराकी प्रदेश पडला आहे. २००३ च्या हल्ल्यानंतर अमेरिका आता इराकी फौजेने देशाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा करीत आहे. इराकमधील दुसऱ्या युद्धात पडण्याची अध्यक्ष ओबामा यांची इच्छा नाही. अमेरिकी सैनिकांनी अर्बिल येथे इराक - अमेरिका संयुक्त केंद्र स्थापन केले आहे, असे संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी म्हटले आहे.
हरलेला प्रदेश पुन्हा जिंकणे कठीण
By admin | Updated: July 5, 2014 05:09 IST