अ‍ॅडॉल्फ हिटलरचे जन्मघर पाडून नाझींच्या स्मृतीही पुसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 05:07 AM2016-10-19T05:07:26+5:302016-10-19T05:07:26+5:30

नवनाझीवादी ज्यातून स्फूर्ती घेतील असे देशात काहीही शिल्लक न ठेवण्याचा चंग आॅस्ट्रिया या हिटलरच्या जन्मभूमीने बांधला आहे.

By destroying Adolf Hitler's homestead, the Nazi memorial will be erased | अ‍ॅडॉल्फ हिटलरचे जन्मघर पाडून नाझींच्या स्मृतीही पुसणार

अ‍ॅडॉल्फ हिटलरचे जन्मघर पाडून नाझींच्या स्मृतीही पुसणार

Next


व्हिएन्ना : ‘नाझी भस्मासूर’ म्हणून तिरस्कृत ठरलेल्या आणि जगावर दुसरे महायुद्ध लादणाऱ्या अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सर्व दृष्य स्मृती पार पुसून टाकण्याचा व नवनाझीवादी ज्यातून स्फूर्ती घेतील असे देशात काहीही शिल्लक न ठेवण्याचा चंग आॅस्ट्रिया या हिटलरच्या जन्मभूमीने बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिटलरचे जन्मघर जमीनदोस्त करून तेथे पूर्णपणे नवी इमारत बांधण्याची तयारी आॅस्ट्रियन सरकारने सुरु केली आहे.
पश्चिम आॅस्ट्रियातील ब्राऊनाऊ शहरातील एका तीन मजली घरात २० एप्रिल १८८९ रोजी हिटलरचा जन्म झाला होता. हमरस्त्याच्या चौकात चटकन नजरेत भरणारी पिवळ््या रंगाची ही इमारत आजही घडधाकट आहे. हिटलरचे प्रशंसक या वास्तूला पर्यटनस्थळ म्हणून भेट देतात व नवनाझीवादी त्याकडे स्फूर्तिस्थान म्हणून पाहतात. सध्या ही इमारत एका महिलेच्या खासगी मालकीची आहे.
या वास्तूशी हिटलरचा असलेला संबंध कायमचा संपुष्टात यावा व दृष्य स्मृती म्हणूनही तिचे कोणाला आकर्षण वाटू नये यासाठी ही इमारत पाडून टाकण्याचा किंवा तिचा चेहरामोहरा पार बदलून टाकण्याचा विचार सरकारी वर्तुळात गेली काही वर्षे आहे. त्यासाठी सध्याच्या मालकिणीला विचारले. पण तिने घर विकायला किंवा त्याचे नूतनीकरण करू देण्यासही ठाम नकार दिला.
यातून कसा मार्ग काढावा याचा विचार करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक आयोग नेमला होता. सरकारने ही वास्तू ‘राष्ट्रीयीकरण’ करून ताब्यात घ्यावी व तेथे पूर्णपणे नवी इमारत बांधावी, अशी शिफारस आयोगाने केली.
यासाठी संसदेकडून कायदा मंजूर करून घ्यावा लागेल. सध्या सत्तेत असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक अ‍ॅण्ड सेंट्रिस्ट पार्टी’चे भक्कम बहुमत आणि बहुतांश विरोधी पक्षांचाही या योजनेला असलेला पाठिंबा पाहता असा राष्ट्रियीकरणाचा कायदा सहज मंजूर होईल.
गृहमंत्री वोल्फगांग सोबोत्का म्हणाले की, हिटलरचे जन्मघर म्हणून या इमारतीची कोणतीही ओळख वा प्रतिकही शिल्लक राहू नये यासाठी तिची पूर्णपणे नव्याने उभारणी करावी लागेल. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते कार्ल-हिन्झ ग्रुंडबोएक म्हणाले, याचा अर्थ पाया सोडला तर या इमारतीचे काहीही शिल्क न ठेवता तेथे नवी इमारत बांधावी लागेल. नव्या इमारतीत एखादे सरकारी किंवा सामाजिक संस्थेचे कार्यालय थाटता येईल, असेही ते म्हणाले. यासाठी संसदेकडून कायदा करून घेऊन सर्व औपचारिकता या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असेही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
व्हिएन्नामधील ज्यू समाज आणि सरकारी मदतीने स्थापन झालेले नाझीविरोधी संशोधन केंद्र यांचा सरकारच्या या योजनेला पाठिंबा आहे. मात्र इतिहासकार याला विरोध करताना म्हणतात की, कसाही असला तरी हिटलर इतिहासपुरुष होता, त्यामुळे इतिहासाचे जतन करण्यासाठी ही इमारत आणि त्यातील ज्या घरात हिटलरचे कुटुंब काही काळ वास्तव्याला होते ते आहे तसेच राहू देणे गरजेचे आहे. (वृत्तसंस्था)
>इतर स्मृती पूर्वीच पुसल्या
व्हिएन्नाच्या जवळच लिओनडिंग गावातील ज्या घरात हिटलरने किशोरवयात वास्तव्य केले
त्याचा वापर सध्या गावातील दफनभूमीचे शवपेट्या ठेवण्याचे गोदाम म्हणून केला जातो.हिटलरच्या आई-वडिलांचे जेथे दफन केले गेले तेही नवनाझींसाठी तीर्थक्षेत्र झाले होते. हिटलरच्याच एका वंशजाच्या विनंतीवरून त्या थडग्यांची ओळख सांगणारा दगड अलिकडेच काढून टाकण्यात आला आहे.ब्राऊनाऊजवळ फिशलहॅम येथे हिटलर ज्या शाळेत शिकला तेथे आता त्याने केलेल्या अमानुष गुन्ह्यांची जंत्री लिहिलेला निषेधफलक लावण्यात आला आहे.जर्मनीत ज्या बंकरमध्ये हिटलरने ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या केली तो पाडून टाकून ती जागा बरीच वर्षे मोकळी ठेवण्यात आली होती. नंतर १९८०च्या दशकात पूर्व जर्मनीच्या सरकारने तेथे एक निवासी संकुल बांधले.

Web Title: By destroying Adolf Hitler's homestead, the Nazi memorial will be erased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.