जगात मौल्यवान धातू सोन्या, चांदीचे दर आकाशाला भिडलेले आहेत. आणखी काही महिन्यांनी हे दर एवढे वाढतील की सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत. सामान्य लोक नंतर सोन्याचे पाणी मारलेले दागिने, १-२ ग्रॅमचे दागिने घेण्यास सुरुवात करतील, अशी वेळ येणार आहे. अशातच संशोधकांच्या हाती मोठे घबाड लागले आहे.
संशोधकांनी असा बॅक्टेरिया शोधून काढला आहे जो विषारी माती खाऊन विष्ठेतून २४ कॅरेट सोने बाहेर टाकतो. विषारी मातीतच तो आढळतो आणि सोन्या तांब्यासारखे धातू तो आरामात पचवतो. या बॅक्टेरियाचे नाव कप्रीएविडस मेटालिड्यूरन्स असे ठेवण्यात आले आहे.
आता अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल की हा बॅक्टेरिया सोने कसे काय बाहेर काढतो? तर त्याचे असे आहे की, हा बॅक्टेरिया माती खाल्ल्यानंतर त्यावर एक खास केमिकल प्रोसेस करतो. यामध्ये विषारी धातू सोन्याच्या कणांमध्ये रुपांतरीत होतात. यानंतर तो हे कण बाहेर टाकतो. हा शोध सोन्याच्या मायनिंगच्या पद्धतीला पुर्णपणे बदलून टाकू शकतो, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
सोन्याच्या खाणींमध्ये मोठ्याप्रमाणावर खोदाई करावी लागते, यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या बॅक्टेरियाच्या मदतीने कमी प्रदुषणात स्वस्त आणि टिकाऊ पद्धतीने सोन्याचे उत्पादन केले जाऊ शकणार आहे. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि खाणीतील उरलेल्या टाकाऊ मातीमधूनही सोने काढता येणार आहे.