सहज कल्पना करुन पहा, आपण सगळे -म्हणजे अखील मानवजात ‘हॅलो’ म्हणूनच फोनवर विशेषत: लॅण्डलाइन फोनवर कसे बोलायला लागलो.परस्परांना भेटलं की, एकमेकांना अभिवादन-दुआसलाम करण्याच्या प्रत्येक जाती-धर्माच्या प्रथा परंपरा वेगळ्या होत्या. भारतातच नाही तर जगभरातही त्या आजही आहेत.मात्र फोन आला अािण निदान फोनवर तरी बहुतांशजण हॅलो म्हणू लागले. त्याअर्थानं हा हॅलो शब्द धर्मनिरपेक्ष झाला.जी क्रांती फोनने शब्दात करुन दाखवली तीच क्रांती आता कोरोना नावाचा हा विषाणू आता वर्तनात करणार अशी चिन्हं दिसायला लागली आहे.अलिकडेच तुम्ही एक व्हीडीओ पाहिला असेल त्यात जर्मन पंतप्रधान अंजेला मर्केल यांना शेकहॅण्ड न करता त्यांच्या एका मंत्र्यानं नमस्ते केल्याचा! जगभरच नेत्यांनी ( अगदी रशियन पुतीन सुद्धा) आदेश काढले की, आता शेकहॅण्ड नको, लांबूनच हात जोडा! त्यातली गंमत बाजूला ठेवली तरी, हा कोरोना लोक एकमेकांना जगभर जसे भेटतात. म्हणजे शेकहॅण्ड करतात किंवा गळाभेट घेतात ते बंद करुन दुरुनच अभिवादन करायला लावेल अशी चिन्हं आहेत. मुळात माणसांनी आनंदानं एकमेकांची गळाभेट घेणं हे परस्परांवर विश्वास ठेवणं असतं, तो विश्वास स्पर्शातून जाणवतो.
शेवटी परस्परांवर विश्वास ठेवण्याचे, आपल्याला काळजी आहे हे सांगण्याचे, आनंद वाटून घेण्याचे आणि आपली भावना समोरच्यार्पयत पोहचवण्याचे अनेक मार्ग लोक शोधून काढतातच.त्यात तरुण पिढी अग्रेसर असते. जगण्याची उमेद अशीच टिकते.म्हणून तर शेकहॅण्ड ना सही, लेग-शेक तर आहे असं म्हणत नवा ट्रेण्डही रुजू पाहतो आहे.बघायचं तो कोरोनोत्तर काळात टिकतो का?