आशियातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची नवी लाट आलेली पाहायला मिळत आहे. सिंगापूर, चीन, थायलंड आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ दिसून येत आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये २८ टक्के वाढ झाली आहे. ३ मे पर्यंत जवळपास १४,२०० नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
'ब्लूमबर्ग'च्या रिपोर्टनुसार, कोरोनाचा पुन्हा प्रसार आशियातील व्हायरसच्या नवीन लाटेशी जोडलेला असू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच एप्रिलमध्ये झालेल्या सोंगक्रान फेस्टिव्हलपासून थायलंडमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. सध्या सिंगापूरमध्ये LF.7 आणि NB.1.8 या दोन्ही व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. हे दोन्ही JN.1 स्ट्रेनशी संबंधित आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही व्हेरिएंट मिळून दोन तृतीयांशपेक्षा जास्त संक्रमित प्रकरणांसाठी जबाबदार आहेत.
'या' लोकांना जास्त धोका
कमकुवत इम्युनिटी असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका असतो. या लोकांना जास्त संसर्ग होत आहे. याशिवाय ज्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आहेत त्यांनाही जास्त धोका असतो. डॉक्टरांच्या मते, या ऋतूमध्ये कमकुवत इम्युनिटी असल्यामुळे हे होऊ शकतं. यामुळे सिंगापूरमधील लोकांना बूस्टर डोस घेण्यास सांगितलं जात आहे.
कोरोना हा फ्लूसारखा आहे का?
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, देशातील लोकसंख्येची इम्युनिटी कमी होत आहे. सध्याचा व्हेरिएंट हा वेगाने पसरत आहे. मात्र साथीच्या काळात आधी आढळलेल्या व्हेरिएंटपेक्षा जास्त गंभीर आजार निर्माण करत आहे असे कोणतेही संकेत नाहीत. डॉक्टर कोरोना व्हायरसच्या या नवीन लाटेला नॉर्मल फ्लू मानत आहेत. 'सीएनए'च्या रिपोर्टनुसार, बहुतेक लोक लवकर बरे होत आहेत.
भारताला धोका आहे का?
सध्या भारतात कोरोना व्हायरसचा कोणताही मोठा धोका नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत डॅशबोर्डनुसार, भारतात आतापर्यंत कोरोनाचे फक्त ९३ रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोरोना साथीच्या नवीन लाटेबाबत कोणतेही संकेत नाहीत. नेहमीच सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.