लंडन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या खडाजंगीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या वादविवादानंतर झेलेन्स्की यांना युरोपीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेन आपल्या प्रतिष्ठेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, युरोपसाठी लढत आहे, असे म्हटले आहे. तर जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी, स्पेन आणि पोलंडच्या पंतप्रधानांनी ‘तुम्ही एकटे नाही आहात, युरोप तुमच्या पाठीशी आहे’ असे सांगत पाठिंबा दर्शवला.
नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर यांनी व्हाइट हाऊसमधील घटना निराशाजनक आणि गंभीर असल्याचे म्हटले. तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वाॅन डेर लेअन यांनी न्याय्य आणि श्वाश्वत शांततेसाठी आम्ही तुमच्या बरोबर काम करत राहू, असे ट्वीट केले.