नेपाळमध्ये जेन-झी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील हिंसाचार आणि जाळपोळीमुळे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यानंतर सैन्याने महत्त्वाची सुरक्षा ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. या सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, चीनने सर्व बाजूंनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
चीनने व्यक्त केली शांततेची आशा
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "चीन आणि नेपाळ हे पारंपरिकदृष्ट्या चांगले मित्र आणि शेजारी आहेत." त्यांनी आशा व्यक्त केली की, नेपाळमधील सर्व पक्ष देशांतर्गत प्रश्न समजूतदारपणे सोडवतील आणि लवकरच सामाजिक सुव्यवस्था व प्रादेशिक स्थिरता पूर्ववत होईल.
ओली यांच्या राजीनाम्यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यास लिन जियान यांनी नकार दिला. ओली यांना चीन समर्थक नेता मानले जाते आणि त्यांनी नेपाळ-चीनच्या धोरणात्मक संबंधांना बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चीनने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर दिला
लिन जियान यांनी हे स्पष्ट केले की, नेपाळमधील हिंसाचारात अद्याप कोणत्याही चीनी नागरिकाला दुखापत झालेली नाही. त्यांनी नेपाळमध्ये राहणाऱ्या चिनी नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा आणि अनावश्यकपणे घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच, चीनने नेपाळमधील आपल्या दूतावासात आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे. परिस्थिती बिघडल्यास तातडीने दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नेपाळमध्ये आंदोलनामुळे तणाव
पंतप्रधान ओली यांनी नुकतेच शांघाय सहकार्य संघटना परिषदेत आणि दुसऱ्या महायुद्धावरील लष्करी परेडमध्ये भाग घेतला होता. परंतु, नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या आंदोलनामुळे त्यांना राजीनामा देणे भाग पडले. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईत २०हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. आंदोलनानंतर सोशल मीडियावर घालण्यात आलेले निर्बंधही नंतर मागे घेण्यात आले.