अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५०% टॅरिफला चीनने विरोध केला. चीनचेभारतातील राजदूत राजदूत शू फीहॉन्ग यांनी टीका केली. अमेरिकेच्या कर आकारणीविरुद्ध चीन भारतासोबत असल्याचे त्यांनी म्हटले. "अमेरिकेने दीर्घकाळ मुक्त व्यापाराचा लाभ घेतला आहे, पण आता ते गुंडगिरीचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत", अशी टीका त्यांनी केली.
राजदूत शू फीहॉन्ग म्हणाले की, भारत आणि चीन हे भागीदार आहेत, प्रतिस्पर्धी नाहीत. दोन्ही देशांनी परस्पर अविश्वास टाळावा आणि संवादाद्वारे मतभेद सोडवावेत. चीन-भारत संबंध पूर्णपणे सुरळीत झालेले नाही, पण एकता आणि सहकार्य हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
चीनची बाजारपेठ भारतीय वस्तूंसाठी खुली
अमेरिकेने कर लादण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, चीनने भारताला चीनची बाजारपेठ भारतीय वस्तुंसाठी खुली असल्याचा संदेश दिला. "आम्ही चिनी बाजारपेठेत भारतातील सर्व वस्तूंचे स्वागत करतो. चीन आणि भारत एकत्रितपणे विकास धोरणे राबवू शकतात आणि सहकार्याचा मोठा पायंडा पाडू शकतात." दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही शू फीहॉन्ग यांनी सांगितले.
आशियातील धोरणात्मक विश्वास आणि स्थिरता
भारत आणि चीनने धोरणात्मक परस्पर विश्वास मजबूत करावा आणि आशियातील सुरक्षा आणि स्थिरता संयुक्तपणे जपावी असे राजदूत म्हणाले. त्यांच्या मते, भारत आणि चीन हे आशियाच्या अर्थव्यवस्थेचे "ट्विन इंजिन" आहेत आणि हे संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहेत.
भारत आणि चीन जगात आघाडीची भूमिका बजावू शकतात असे त्यांनी सांगितले. शू फीहॉन्ग म्हणाले की, दोन्ही देश महत्त्वाचे शेजारी आहेत, मोठे विकसनशील देश आहेत आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या संबंधांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारत-चीन व्यापार ७४.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे, हा गेल्या वर्षीपेक्षा १०.२ टक्के जास्त आहे, अशी माहिती चीनच्या राजदूतांनी दिली.