बीजिंग : चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठ्या धरणाच्या बांधकामास शनिवारी औपचारिक सुरुवात केली. अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेजवळ बांधण्यात येत असलेल्या या धरणासाठी चीन सरकार तब्बल १६७.८ अब्ज डॉलर खर्च करणार आहे.
चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या हस्ते धरणाचा पायाभरणी समारंभ शनिवारी झाला. या समारंभात त्यांनी धरणाच्या कामास प्रारंभ झाला असल्याची अधिकृत घोषणा केली. तिबेटमधील न्यिंगची शहराजवळील सखल भागात हे धरण उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीस स्थानिक भाषेत यार्लुंग झँगबो असे नाव आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या धरणावर न्यिंगची मेनलिंग जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, हा ऊर्जा प्रकल्प जगातील सर्वांत मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. १६७.८ अब्ज डॉलर खर्चाच्या या प्रकल्पात ५ जलविद्युत स्टेशन्स असणार आहेत. त्यातून दरवर्षी ३०० अब्ज केडब्ल्यूएच विजेची निर्मिती हाेईल. ३० कोटी लोकांची विजेची गरज त्यातून भागेल. हा प्रकल्प भारत आणि बांगलादेश या देशांसाठी तो चिंतेचा विषय ठरणार आहे.