China And Pakistan In UN: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व आपल्या भूमीतून घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने तत्काळ संपूर्ण बंदी लागू केली. पाकिस्तानबरोबर हवाई व जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच काही युट्युब चॅनलही बंद करण्यात आले आहेत. यातच भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला सातत्याने सतावत आहे. यातच पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत धाव घेतली. या बैठकीत चीननेही सहभाग घेतला होता. परंतु, चीन हा पाकिस्तानशी डबल गेम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका, रशियासह अनेक देशांनी भारताला खुला पाठिंबा दिला आहे. तर अनेक मुस्लिम देशांचे समर्थनही भारताला असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान बऱ्याच प्रमाणात एकाकी पडलेला दिसत आहे. यातच चीनने मात्र भारताविरोधात पाकिस्तानला समर्थन दिले आहे. असे असले तरी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सहभागी झालेला चीन पाकिस्तानच्या बाजूने काहीही बोलला नसल्याचे समजते.
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम!
बंद दाराआड झालेल्या बैठकीत पाकिस्तानचा मित्र देश चीनही उपस्थित होता. पाकिस्तानला वाटले होते की, त्याला जगातील देशांची सहानुभूती मिळेल पण अगदी उलटे घडले. या बैठकीत पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानला तीव्र प्रश्न विचारण्यात आले. अशा वेळेस चीनने याबाबत काहीच भूमिका मांडली नसल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर चिनी मीडिया पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक शब्दही काढत नसल्याचे समजते.
एकीकडे द्विपक्षीय चर्चा, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन नाही!
पाकिस्तानमधील चीनचे राजदूत जियांग झोदोंग यांनी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान, ते म्हणाले की, दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा देईल. चिनी राजदूतांनी चीन आणि पाकिस्तानमधील कायमस्वरूपी मैत्रीबद्दल चर्चा केली. एकीकडे चीन द्विपक्षीय बैठकांमध्ये पाकिस्तानला पाठिंबा देण्याबद्दल बोलत असताना, दुसरीकडे मात्र आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला समर्थन देण्याचे टाळताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कोणत्याही देशाने पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही; उलटपक्षी, चीननेही पाकिस्तानच्या समर्थनार्थ काहीही म्हटले नाही.
दरम्यान, बंद दाराआड झालेल्या बैठकीत, सदस्य देशांनी पाकिस्तानकडून भारताबाबत पसरवल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हला फेटाळून लावले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील काही देशांनी पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर आणि भारताला देण्यात येणाऱ्या अण्वस्त्रांच्या धोक्यावरही प्रश्न उपस्थित केले. सदस्य देशांनी याला पाकिस्तानची प्रक्षोभक कृती म्हटले आहे. बैठकीनंतर कोणत्याही देशाने यावर कोणतेही विधान केले नाही किंवा कोणताही प्रस्ताव पुढे आलेला नाही.