एआय तंत्रज्ञान आलं आणि त्यानं जणू आता आपलं सारं आयुष्यच व्यापलं आहे. आपल्याला लागणारी, हवी असणारी कोणतीही माहिती आपण आता चॅटजीपीटीला विचारतो. तो जे काही उत्तर देईल त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे वागतो; पण त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, त्याचे एकेक किस्से आता बाहेर येऊ लागले आहेत. या तंत्रज्ञानानं नात्यांवर तर परिणाम केले आहेतच; पण अनेकांचं आरोग्यही धोक्यात आणलं आहे. त्याचंच एक उदाहरण नुकतंच आयर्लंडमध्ये घडलं. एआय तंत्रज्ञानावर आणि त्यानं दिलेल्या माहितीवर आपण डोळे झाकून किती विश्वास ठेवावा, याबाबत डोळ्यांत अंजन घालणारं हे प्रकरण आहे.
आयर्लंडमधील ३७ वर्षांच्या वॉरेन टिअर्नी यांच्या घशात दुखत होतं; पण त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी त्यांनी चॅटजीपीटीला सल्ला विचारला. आपली लक्षणं त्यांनी चॅटजीपीटीला सांगितली आणि त्यावरचे उपचारही विचारले. चॅटजीपीटीनं त्यांना दिलासा दिला, ‘काहीही घाबरू नका. हे अतिशय किरकोळ दुखणं आहे आणि लवकरच ते बरं होईल. कॅन्सर वगैरेचा विचार तर तुम्ही मनातही आणू नका.’
एआय सुरुवातीपासूनच त्यांना दिलासा देत होतं. चॅटजीपीटनं आधी त्यांना सांगितलं, ‘अशी छोटीमोठी दुखणी प्रत्येकाला होत असतात. त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही.’ दुसऱ्या संभाषणात त्यानं सांगितलं, ‘कशाला काळजी करता? तुमच्या प्रत्येक निदानासोबत मी तुमच्यासोबत आहे. समजा, तुमचं दुखणं म्हणजे कॅन्सर असेल, तरीही त्याला आपण समर्थपणे तोंड देऊ. नसेल, तर काही प्रश्नच नाही.’
टिअर्नी म्हणतात, ‘चॅटजीपीटीच्या याच विश्वासामुळे, याच दिलाशामुळे माझ्या हातातील काही महत्त्वाचे महिने मी गमावून बसलो आणि जेव्हा डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा त्यांनी निदान केलं, तुम्हाला अन्ननलिकेचा चौथ्या टप्प्यातील कॅन्सर झालेला आहे आणि तो बराच पुढे गेला आहे!’ अशा अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता केवळ पाच ते दहा टक्केच असते.
तरीही टिअर्नी यांनी हार मानलेली नाही. त्यांनी आणि त्यांची पत्नी एव्हलिन यांनी आता उपचारासाठी, संभाव्य शस्त्रक्रियेसाठी जर्मनी किंवा भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. उपचारांसाठी निधी जमा करण्यासाठी GoFundMe हे पेजही त्यांनी सुरू केलं आहे.
टिअर्नी यांचा अनुभव हे काही एकमेव उदाहरण नाही. एआयमुळे अडचणीत आल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात ६० वर्षीय अमेरिकन व्यक्तीनं चॅटजीपीटीच्या सल्ल्यानुसार टेबल सॉल्टऐवजी सोडियम ब्रोमाइड वापरलं आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रोमिझम’ झाला असल्याचं निदान केलं.
चीनमध्ये ७५ वर्षीय आजोबा एआय-जनरेटेड मैत्रिणीच्याच प्रेमात पडले. त्यामुळे बायकोपासून घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी कोर्टात खटला दाखल केला आहे. या प्रकरणांमुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे.
ओपन एआयनंही आता चॅटजीपीटीसाठी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ते आता इमोशनल काउन्सेलिंग किंवा थेरपिस्टसारखा सल्ला देऊ शकणार नाही. या संदर्भात तज्ज्ञांचंही स्पष्ट मत आहे, तंत्रज्ञान मार्गदर्शन करू शकतं; पण त्यावर अंधविश्वासही ठेवू नका...