कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने हरलेली बाजी जिंकली आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाने सलग चौथ्यांदा सरकार बनविण्यात यश मिळविले आहे. जानेवारीत ट्रुडो यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. यानंतर मार्क कार्नी यांच्या खांद्यावर गेलेली इज्जत परत मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मदतीला ट्रम्प धावून आले आणि कार्नी यांनी कॅनडा सर केला आहे.
या निवडणुकीत भारताच्या दृष्टीने एक खास निकाल लागला आहे. खलिस्तानी समर्थक जगमीत सिंग याच्या पक्षाचा धुव्वा उडाला आहे. त्याच्या पक्षाला मान्यता टिकवून ठेवण्यासाठी १२ जागा मिळू शकलेल्या नाहीत. यामुळे न्यू डेमोक्रेटीक पार्टीचा दर्जा गेला आहे. जगमीत सिंग देखील स्वत: निवडून येऊ शकलेला नाही.
जगमीत सिंग याने या पराभवामुळे हताश होऊन आपण पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. जगमीत सिंग २०१९ पासून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बर्नाबी सेंट्रल जागेचे प्रतिनिधित्व करत होता. या निवडणुकीत तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. जगमीत सिंग हा खलिस्तानचा कट्टर समर्थक आहे. त्याने अनेकदा कॅनडातील खलिस्तानी कार्यकर्त्यांच्या वतीने आवाज उठवला आहे. आता कॅनडाच्या संसदेत खलिस्तानींना कोणी वाली राहिलेला नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या आणि कॅनडाचे अमेरिकेत विलीनीकरण होण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर कॅनडाची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यात आली. कार्नी हे माजी बँकर आहेत. त्यांच्या नेतृत्वात लिबरल पक्षाने हरलेली निवडणूक जिंकली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाचे पियरे पोइलिवरे याचा परभव झाला आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वेगळा देश नाही तर अमेरिकेत सहभागी करून घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून ते कॅनडाला धमक्याही देत होते. कार्नी यांनी निवडणूक प्रचारात सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांना कडाडून विरोध केला. या आक्रमकतेमुळे कार्नी पंतप्रधान झाले आहेत.