‘मी साऊथ कोरियात राहते आहे. इथलं अन्न खाऊन मी विटले आहे. मला प्लीज इथे कुणी भेंडीची भाजी आणून खायला देईल का?’ - खुशी नावाच्या एका भारतीय मुलीची ही आर्त हाक सध्या सोशल मीडियावर घमासान चर्चेचा विषय बनलेली आहे. दर सात मैलांवर भाषा आणि आहारविहाराच्या सवयी बदलतात, असे म्हणतात. त्या न्यायाने परदेशात गेल्यानंतर आपल्या पद्धतीचा आहार हवा असेल तर तो स्वतः रांधून खाण्याशिवाय अनेकांकडे पर्याय नसतो; पण रांधून खायचे तर त्यासाठी आवश्यक घटक पदार्थ तरी उपलब्ध असणे आवश्यक आहे. ते उपलब्ध नसतील तर बरीच गैरसोय होऊ शकते. त्यातही भारतीय शाकाहारी लोकांना परदेशातील वास्तव्यात आहारविहाराच्या सवयींबाबत खूप तडजोडी करायला लागतात. कारण, भारतात मिळतात त्या आणि तशा भाज्या, मसाले परदेशात सगळीकडेच मिळतात असे नाही.
परदेशातील शाकाहारी समजले जाणारे अनेक पदार्थ भारतीय शाकाहाराच्या कल्पनांमध्ये बसत नाहीत. दक्षिण कोरियामध्ये राहात असलेली खुशी तिथल्या जेवणाला फारच कंटाळली आहे. भारतातील शाकाहारी जेवण आपण ‘मिस’ करत असून भेंडीची भाजी खायची असल्याचं ती अगदी कळवळून म्हणते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परदेशात राहताना चांगलं शाकाहारी जेवण मिळवणं कसं दुर्मीळ आहे, त्याबाबतच्या प्रतिक्रिया जगभरात पसरलेल्या शाकाहारी भारतीय मंडळींनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
खुशी शिक्षणासाठी दक्षिण कोरियामध्ये राहाते. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत आपण भारतीय आणि शाकाहारी असल्यामुळे दक्षिण कोरियात जेवणाची कशी गैरसोय होते, हे ती विस्ताराने सांगते. ‘कोरियन जेवणात मांसाहार प्रमुख आहे. मी शाकाहारी आहे म्हणजे फक्त भाज्या खाते, असं इथल्या लोकांना सांगितलं की त्यांना धक्का बसतो; पण इथे भारतातल्यासारख्या भरपूर भाज्या मिळत नसल्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इथे भरपूर कॅफे आहेत; पण मला कॉफी फारशी आवडत नाही. इथल्या बेकरी छान आहेत. ब्रेड ताजे आणि चविष्ट मिळतात. मी ब्रेड खाते; पण ते खूप गोड असतात,’ अशी तक्रार खुशीने केली आहे. ही तक्रार करतानाच ‘मला कधी एकदा भेंडीची भाजी खायला मिळेल, असं झालं आहे,’ असंही खुशी म्हणते.
खुशीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘तू तिथे कशी जगतेस? तिथे शाकाहारी काय मिळतं? तू रोज खातेस तरी काय?’ असे प्रश्न अनेकांनी तिला विचारले आहेत. ‘मी भारतीय आहे, मी मांसाहारही करतो. त्यामुळे मी जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो. परदेशात राहायचं असेल तर आपण तेवढे बदल स्वीकारायलाच हवेत,’ असा सल्लाही खुशीला अनेकांनी दिलाय.
‘ओटीटी’मुळे जगभरात सध्या कोरियन अर्थात के ड्रामाचे चाहते असंख्य आहेत. कोरियन संस्कृती, आयुष्य, कोरियन खाद्यसंस्कृतीही प्रसिद्ध झाली आहे. खासकरून तरुणाईमध्ये तिचा बोलबाला प्रचंड आहे. अनेक कोरियन पदार्थ आता भारतीय स्वयंपाकघरातही शिजवले जातात. खुशी तर थेट कोरियातच राहाते आहे, त्यामुळे भेंडीच्या भाजीची आठवण काढत उसासे टाकण्यापेक्षा तिने खरं म्हणजे ‘के फूड’ खाऊन ते आवडून घेतलं पाहिजे, असे सल्ले देणारे लोकही कमी नाहीत!