पाकिस्ताननेभारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या या कारवाईला ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, भारताने त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य केले आहे. रावळपिंडीतील बास नूर खान हवाई तळाजवळ, चकवालजवळील मुरीद आणि पूर्व पंजाबमधील झांग जिल्ह्यातील रफीकी हवाई तळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले, असा दावा शनिवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने केला.
याआधी शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ शहरांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले होते. पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या अग्रेषित तळांना आणि शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तो भारतीय सैन्याने यशस्वीरित्या हाणून पाडला. यानंतर, भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देत रावळपिंडीसह पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई दलाच्या तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
भारतात २६ ठिकाणी ड्रोन दिसले
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला ते काश्मीरमधील भूजपर्यंत भारतातील २६ ठिकाणी ड्रोन दिसले. पंजाबमध्ये एका ठिकाणी नागरिकांवर ड्रोन पडल्याने एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले. गेल्या दोन रात्रींपासून पाकिस्तान भारतावर अयशस्वी हवाई हल्ले करत आहे. गुरुवारी रात्रीही पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, ती भारताने पूर्णपणे हाणून पाडली.
पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानने शुक्रवारी रात्री सीमाभागात ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्यात आला. यानंतर रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ले चढविले आहेत. पाकिस्तानचे तीन एअरबेससह इस्लामाबाद, लाहोरवर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्लीवर फतेह २ ही मिसाईल डागल्याचा दावा सरकारी सुत्रांनी केला आहे.