‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ असं म्हणतात. एका भारतीय पर्यटक महिलेने पॅरिसमध्ये असा अनुभव नुकताच घेतला. आयफेल टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गार झालेलं स्टार्टर, अजिबात न चावला जाणारा ब्रेड आणि निकृष्ट दर्जाचे ‘डेझर्ट’ मिळाल्यानंतर या महिलेने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडली आणि बघता बघता तिचा व्हिडीओही व्हायरल झाला. ‘पॅरिस इज स्कॅम’ असं म्हणत काहींनी तिला पाठिंबा दिला, तर काहींनी तिची खिल्ली उडवली.
‘मेक ट्रॅव्हल इझी’ या नावाने इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या या महिलेचं नाव ऐश्वर्या असं आहे. ती मूळची तमिळ. ती यूकेमध्ये स्थायिक झाली आहे. पॅरिसमध्ये पर्यटनासाठी गेल्यावर आयफेल टॉवर पाहणं हे इतर अनेकांचं असतं, तसंच ऐश्वर्याचंही स्वप्न होतं. तिथे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर मात्र ऐश्वर्याचा भ्रमनिरास झाला. आयफेल टॉवर बघत बघत जेवायचं म्हणून प्रचंड पैसे मोजूनही गार झालेलं ‘स्टार्टर’, न चावला जाणारा ब्रेड आणि निकृष्ट चवीचे ‘डेझर्ट’ समोर आल्यानंतर तिचा चेहरा पडला. आपल्याला आलेला अनुभव तिने इन्स्टाग्राम हँडलवरून ‘फॉलोअर्स’पर्यंत पोहोचवला आहे. न चावता येणारा ब्रेड मिळाल्यावर ‘तुमच्याकडे थोडा मऊ ब्रेड आहे का?’ असं ऐश्वर्याने तिथल्या ‘वेटर’ला विचारलं, त्यावेळी तिला थेट नाही असं उत्तर देण्यात आलं.
भरपूर पैसे मोजूनही चांगलं काहीच न मिळाल्यामुळे ऐश्वर्याने ‘त्या रेस्टॉरंटमध्ये येऊन पैसे वाया घालवू नका’ असा सल्ला आपल्या फॉलोअर्सना दिला आहे. असा अनुभव घेणारी ऐश्वर्या एकटीच नाही. तिच्या शेजारच्या टेबलवर जेवत असलेली न्यूझीलंडची नागरिक असलेली एक वयस्क महिलाही त्या जेवणावर समाधानी नसल्याचा अजून एक व्हिडीओ ऐश्वर्याने पोस्ट केला आहे. या पोस्टवर साहजिकच अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. ‘जगात अनेक प्रकारचे ब्रेड मिळतात आणि युरोपमध्ये मिळणारे ब्रेड मऊ नसतातच’, ‘युरोपमध्ये जेवण्याची तुमची पहिली वेळ असावी असं वाटतं, युरोपमध्ये असंच जेवण मिळतं,’ ‘पॅरिस इज स्कॅम,’ ‘फ्रेंच जेवण बेचवच आहे, वैविध्यपूर्ण भाज्या नाहीत, फळं नाहीत, आमची उपासमार होते’ अशा कितीतरी प्रतिक्रिया ऐश्वर्याच्या पोस्टवर आल्या आहेत.
सोशल मीडियामुळे पर्यटकांनी आपल्या भ्रमंतीदरम्यान घेतलेले अनुभव सर्रास जगासमोर येतात. नुकताच एप्रिल महिन्यात एका फ्रेंच पर्यटकाने ‘भारतात पर्यटनासाठी जात असाल तर तुमचा बेत रद्द करा’ असं आवाहन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भारतातला प्रवास म्हणजे नुसताच गडबड, गोंधळ आणि किचाट आहे. तुम्हाला शांतपणे प्रवास करायचा असेल तर भारतीय रेल्वेत पायही ठेवू नका, तिथे उंदीर आणि झुरळं असतात, रात्रीच्या वेळी प्रवासात झोपता येत नाही, लोक फोनवर बोलत असतात, एक सहप्रवासी व्हिडीओ कॉलवरून मला त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलण्याचा आग्रह करत होता असं म्हणत व्हिक्टर नामक या फ्रेंच पर्यटकाने भारतात प्रवास करताना आलेल्या भयंकर अनुभवांबद्दल मन मोकळं केलं होतं. भारत म्हणजे ‘केऑस’ असल्याचंही त्याने म्हटलं होतं. आता ऐश्वर्याने पॅरिसमधल्या जेवणाचा अनुभव घेतल्यानंतर ‘पॅरिस इज स्कॅम’ असा सूर सोशल मीडियावर दिसून येत आहे.