मास्कचा कडवा विरोधक, कोरोनाची शिकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 12:16 PM2021-09-03T12:16:28+5:302021-09-03T12:20:01+5:30

मास्क घातल्यामुळे  व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येतो,  मुलांना सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागतं अशी भूमिका घेऊन अमेरिकेत आंदोलन करणाऱ्या, त्याविरुद्ध आवाज उठवताना फ्रीडम रॅलीही काढणाऱ्या कॅलेब वॉलेस या तरुणाचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला

Bitter opponent of mask, victim of corona pdc | मास्कचा कडवा विरोधक, कोरोनाची शिकार!

मास्कचा कडवा विरोधक, कोरोनाची शिकार!

Next

अमेरिकेच्या टेक्सासमधला कॅलेब वॉलेस. त्याचा मास्क वापरायला ठाम विरोध होता, कारण कोरोना हे उगीचच उभं केलेलं एक भूत आहे असं त्याचं मत होतं. मास्कच्या सरकारी सक्तीविरुध्द फ्रीडम मोर्चे काढणारा हा कॅलेब वॉलेस - दोनच दिवसांपूर्वी अखेर कोरोनाच्या संसर्गाने मरण पावला.

आम्ही मास्क लावणार नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही, लस घेणार नाही, त्यासंदर्भातल्या कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही.. अशी भूमिका सुरुवातीला आपल्याकडेही अनेक लोकांनी घेतली होती. पण कोरोनाचं भयानक रूप हळूहळू सगळ्यांसमोर आल्यानंतर  अनेकांचा विरोध मावळला. सरकारनंही सक्ती सुरू केल्यानंतर त्यांना आपली भूमिका गुंडाळून ठेवावी लागली. पण जगभरातल्या काहींना अजूनही वाटतं,  लोकांचं घराबाहेर पडणं बंद करून, त्यांना सक्तीनं मास्क घालायला लावून लाेकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. त्यामुळे ते अजूनही कोरोनासंदर्भातील स्वयंशिस्त पाळायला तयार नाहीत. 

मास्क घातल्यामुळे  व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येतो,  मुलांना सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागतं अशी भूमिका घेऊन अमेरिकेत आंदोलन करणाऱ्या, त्याविरुद्ध आवाज उठवताना फ्रीडम रॅलीही काढणाऱ्या कॅलेब वॉलेस या तरुणाचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला. ‘कोरोना आणि मास्क वापरणं हे थोतांड आहे’ अशी भूमिका घेऊन वॉलेसनं  अनेक समविचारी  लोक जमा केले होते. सोशल मीडिया आणि रस्त्यावरही त्यांनी त्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. साधारण महिनाभरापूर्वी कॅलेबला कोरोनाची लक्षणं जाणवायला सुरुवात झाली, तरीही त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला काहीही होणार नाही, असं समजून ‘घरगुती’ उपचार सुरू केले. अर्थातच त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि कॅलेबला रुग्णालयात दाखल करावं लागलं. सुमारे महिनाभर तो रुग्णालयात होता. 

तीस वर्षीय कॅलेब ‘सॅन ॲन्जेलो फ्रीडम डिफेण्डर्स’ या संस्थेचा सहसंस्थापक आणि ‘वेस्ट टेक्सास मिनीटमन’ या संस्थेचा राज्य समन्वयक होता. त्याला तीन मुलं आहेत आणि त्याची पत्नी जेसिका चौथ्यांदा गर्भवती आहे. आपल्या पतीच्या आरोग्य स्थितीबाबत जेसिका वॉलेस सोशल मीडियावर आणि इतर माध्यमातून लोकांना माहिती देत होती. जेसिका सांगते, २६ जुलैपासून कॅलेबला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागली, पण त्यानं त्यावर कोणताही योग्य उपचार न घेता व्हिटॅमिन सी, झिंक ॲस्पिरिन आणि इव्हेरमेक्टिन या औषधांचा मारा केवळ सुरू ठेवला. कोरोनासाठी या औषधांचा अतिरिक्त मारा करणं योग्य नाही, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असूनही त्यानं त्यांचं ऐकलं नाही. ३० जुलै रोजी त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. ८ ऑगस्टपर्यंत तो बेुशद्ध आणि व्हेण्टिलेटरवर होता. त्यानंतर मात्र त्यानं या जगाचा निरोप घेतला.

कॅलेबचा मृत्यू होण्याच्या एक दिवस आधीच त्याची पत्नी जेसिकानं ‘भविष्य’ लक्षात घेऊन आपल्या फॅमिली ग्रुपवर पोस्ट टाकली होती, ‘कॅलेब हा काही परिपूर्ण व्यक्ती नव्हता, त्याच्यात काही अवगुण होते, पण त्याचं त्याच्या कुटुंबावर आणि विशेषत: आपल्या मुलींवर निरतिशय प्रेम होतं. त्याच्या या प्रेमामुळेच तो कायम आमच्या लक्षात राहील.. कॅलेबची भूमिका आणि त्याचा दृष्टिकोन, यामुळे त्याच्या जवळच्या अनेक लोकांना वाईट वाटलं असेल, त्याबद्दल मी खेद व्यक्त करते. आयुष्याचा नवा दृष्टिकोन आणि जगण्याची नवी आसक्ती घेऊन तो ‘परतेल’ असं आम्हाला वाटत होतं, पण त्याला ती संधी नियतीनं दिली नाही. मी त्याच्याविषयी आणखी काही बोलू शकत नाही, कारण भावनांचा आवेग आता मला सहन होत नाही..

..पण कॅलेब ही एकमेव व्यक्ती नाही, ज्यानं त्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी विज्ञान आणि रुग्णालयाचा आधार घेतला, त्याच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना कोरोनाचं आणि त्याबाबतीत घ्यायच्या काळजीचं महत्त्व पटलं नाही, पण ते जर जिवंत असते, तर त्यांनी नक्कीच कबूल केलं असतं, आपली भूमिका चुकीची होती आणि प्रत्येकानं कोरोनाप्रतिबंधक काळजी घ्यायला हवी.. कोरोना प्रतिबंधक उपाय आणि कोरोना लसीबाबत साशंक असलेले ६१ वर्षीय रेडिओ होस्ट व्हॅलेन्टाइन यांनीही मास्क, लस, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी गोष्टींना कायम विरोध केला, पण काळजी न घेतल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांचंही निधन झालं. 

कोरोना ‘खरा’ ठरला!

कोरोना आपल्याला काहीही करू शकणार नाही, याची व्हॅलेन्टाइन यांना खात्री होती, पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, मी जर यातून वाचलो नाही, तर मात्र ‘कोरोना खरा समजा आणि प्रत्येकानं जरूर लस घ्या.. त्यांचे बंधू मार्क म्हणतात, व्हॅलेन्टाइनला स्वत:च हे सांगण्याची संधी मात्र कोरोनानं दिली नाही.

Web Title: Bitter opponent of mask, victim of corona pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.