इस्लामाबाद : भारताने जर सिंधू नदीचे पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या संदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने शनिवारी प्रसिद्ध केले.
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
यासंदर्भात सिंध प्रांतातील सक्कर येथे एका जाहीर सभेत ते म्हणाले की, सिंधू नदी आमची आहे, ती आमचीच राहील. तिच्यातून एकतर पाकिस्तानचे पाणी किंवा भारतीयांचे रक्त वाहील. भारत प्राचीन संस्कृतीचा वारसदार असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र, पाकिस्तान या संस्कृतीचा खरा रक्षणकर्ता आहे. (वृत्तसंस्था)
प्रांतांच्या संमतीने नवे ६ कालवे बांधणार
सिंधू नदीचे पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानने सिंधू नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या सहा नवीन कालव्यांच्या संदर्भात एक निर्णय घेतला. हे कालवे सर्व प्रांतांच्या संमतीनेच बांधण्यात येतील, असे पाकिस्तान सरकारने ठरवल्याचे पीपीपी या पक्षाने शुक्रवारी सांगितले.
एकत्र संघर्ष करणार
मोहंजोदारो, लारकानामध्ये ही प्राचीन संस्कृती वसली होती. ते प्रांत पाकिस्तानात आहेत. सिंध प्रांत व सिंधू नदीचा हजारो वर्षांचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडू शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानाचे चारही प्रांतांनी एकत्र येऊन पाण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.
'भारतात लोक जास्त; आम्ही अधिक शूर'
बिलावल भुत्तो-झरदारी यांनी सांगितले की, भारताची लोकसंख्या जास्त असली तरी पाकिस्तानचे लोक त्यांच्याहून शूर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युद्धखोर धोरणे, सिंधू नदीचे पाणी रोखण्याचे प्रयत्न पाकिस्तानची जनता, आंतरराष्ट्रीय समुदाय कदापीही सहन करणार नाही.
सिंधू नदीच्या पाण्याची कोणी लूट करत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्ताननेही निषेध केला आहे.