जगातील दिग्गज सोशल मीडिया कंपनी असलेल्या मेटा (फेसबुक) वर युरोपियन युनियनने १.३ अब्ज डॉलर एवढा दंड ठोठावला आहे. ही कारवाई गोपनीयतेशी संबंधित प्रकरणी करण्यात आली आहे. भारतीय रुपयांमध्ये तुलना केल्यास ही रक्कम १० हजार ७६५ कोटी रुपये एवढी होते. हा दंड इतर देशांतील फेसबुक, इन्स्टाग्राम युझर्सचा डेटा अमेरिकेमध्ये पाठवण्यासाठी ठोठावण्यात आला आहे. नियमकाने अमेरिकेमध्ये युझर्सच्या डेटाची शिपिंग रोखण्यासाठी मेटाला एक डेडलाईन दिली होती. मात्र कंपनी युझर्सची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरली.
आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने सांगितले की, युरोपियन डेटा प्रोटेक्शन बोर्डाने त्यांना मेटाकडून १.२ बिलियन युरो एवढा प्रशासकीय दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने दिलेल्या निर्णयानुसार मेटाकडून अमेरिकेत डेटा ट्रान्स्फर त्या लोकांच्या मुलभूत हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.
डीपीसी २०२० पासून मेटा आयर्लंडच्या युरोपियन संघातून संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये व्यक्तिगत डेटाच्या ट्रान्स्फरची चौकशी करत होता. या निर्णयामुळे मेटाला भविष्यात युझर्सचा पर्सनल डेटा यूएसमध्ये पाठवण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच स्टोरेजसारख्या बेकायदेशीर प्रकाराला थांबवण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.