ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला मांडीवर नेऊन बसविले आहे. भारतावर अण्वस्त्र हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पाकिस्तानात नेतृत्व बदल होण्याचे देखील बोलले जात आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे नाव येताच त्यांनी आपल्याला सुरक्षेची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटर, माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगाबाहेर येणार असल्याचे वृत्त येत आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पीटीआयचा संस्थापक इम्रान खानला आठ प्रकरणांत जामीन दिला आहे. तसेच इम्रान खानला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश याह्या आफ्रीदी यांच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. इम्रान खान यांना ९ मे २०२३ रोजी दंगलीशी संबंधित आठ प्रकरणांमध्ये पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
२०२३ मध्ये झालेल्या व्यापक निदर्शने आणि लष्करी आणि सरकारी सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर इम्रान खान याच्याविरोधात आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आठही गुन्ह्यांत इम्रानला जामीन मिळालेला असला तरी त्यांना आणखी एका गुन्ह्यात जामीन आवश्यक आहे. अल कादिर प्रकरणात जामीन मिळाला तरच इम्रान खान बाहेर येऊ शकणार आहे, असे पीटीआयचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झुल्फिकार बुखारी यांनी सांगितले आहे.