शेख हसीनाच्या प्रत्यार्पणावरून भारतासोबत सुरू असलेल्या वादातच बांगलादेश आणि चीनची जवळीक वाढताना दिसत आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन सोमवारी चीन दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान, चीनच्या शी जिनपिंग सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला मोठा दिलासा देणार आहे.
चीन सरकारने बांगलादेशला दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मुदतवाढ दिली आहे. चीनच्या शी जिनपिंग सरकारने बांगलादेशला कर्ज फेडण्यासाठी २० वर्षांऐवजी ३० वर्षांचा वाढीव कालावधी दिला आहे. त्याच वेळी, चीन सरकारने कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले आहे.
याच बरोबर, या बैठकीत दोन्ही देशांनी चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) योजनेप्रती वचनबद्धताही व्यक्त केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
या निवेदनानुसार, तौहीद हुसैन यांनी चीनला कर्जाचा व्याजदर 2-3 टक्क्यांवरून कमी करून 1 टक्का करण्यासंदर्भात, कमिटमेंट फी माफ करण्यासंदर्भात आणि लोन चुकवण्याचा कालावधी 20 वर्षांवरून वाढवून 30 वर्षे करण्यासंदर्भात विनंती केली होती. कर्ज परतफेडीसंदर्भात आपले चांगले रेकॉर्ड लक्षात घेत, चीनने कालावधी वाढवण्याची आमची विनंती मान्य केली आहे आणि व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करण्याचेही आश्वासन दिले आहे.