ढाका : लोकांना कथितरीत्या जबरदस्तीने गायब करण्यात देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना व त्यांच्या सरकारमधील काही प्रमुख अधिकाऱ्यांचा हात असल्याची गंभीर बाब बांगलादेशच्या अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. या पाच सदस्यीय आयोगाने हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याकडे सादर केलेल्या चौकशी अहवाल संबंधित माहिती दिली.
संस्थांचा गैरवापर झाला : देशातील विद्यार्थ्यांनी बंड केल्यानंतर शेख हसीनांचे अवामी लीग सरकार बरखास्त झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांनीदेखील देशातून पलायन केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. लोकांना गायब करण्यात पोलिस विभागासह कायद्याची अंमलबावणी करणाऱ्या इतर प्रमुख संस्थांचाही गैरवापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोण होते सहभागी?
पदच्युत पंतप्रधान हसीना यांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल (सेवानिवृत्त) तारिक अहमद सिद्दीकी, राष्ट्रीय दूरसंचार देखरेख केंद्राचे माजी महासंचालक व बडतर्फ मेजर जनरल झियाउल अहसान, वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिरुल इस्लाम व मोहम्मद हारुन-ओर-रशीद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी लोकांना गायब करण्याच्या कटात सहभागी होते. हे सर्व अधिकारी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
चौकशीदरम्यान काय आढळले?
तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना, त्यांच्या सरकारीमधील प्रमुख अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांनी मिळून गायब केलेल्या नागरिकांची किमान संख्या ३,५०० पेक्षा अधिक असल्याची माहिती ‘वास्तवाचा खुलासा’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. माजी पंतप्रधान हसीनांच्या आदेशानुसार लोकांना जबरदस्तीने गायब करण्यात आल्याचे पुरावे आयोगाने केलेल्या चौकशीदरम्यान आढळून आले असल्याची माहिती अहवाल समोर आल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयाने शनिवारी रात्री माध्यमांना दिली.