बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर आता लष्कराच्या अंतर्गत पुनर्रचनेला वेग आला आहे. नवनियुक्त पंतप्रधान तारिक रहमान यांनी बांगलादेश सैन्यात मोठी 'स्वच्छता मोहीम' राबवत अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तान आणि अमेरिकेचे समर्थक मानल्या जाणाऱ्या जनरलचा समावेश असून, यामुळे बांगलादेशच्या संरक्षण दलात खळबळ उडाली आहे.
या कारवाईतील सर्वात मोठे नाव म्हणजे क्वार्टर मास्टर जनरल लेफ्टिनेंट जनरल फैजुर रहमान. त्यांना त्यांच्या पदावरून हटवून ढाका येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये धाडण्यात आले आहे. फैजुर रहमान यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकर-उज-झमान यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांच्यासोबतच इतर ५ मेजर जनरलनाही महत्त्वाच्या पदांवरून हटवून कमी महत्त्वाच्या विभागात पाठवण्यात आले आहे.
लष्करप्रमुखांवरील 'सावधगिरी' आणि नवे बदलगेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेश लष्करप्रमुख जनरल वकर-उज-झमान हे त्यांच्या ताफ्यातील पाकिस्तान समर्थक जनरलच्या कारवायांमुळे चिंतेत होते. भारताच्या चिकन नेक भागात पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे दौरे याच अधिकाऱ्यांनी युनुस यांच्या साथीने आयोजित केले होते. लेफ्टिनेंट जनरल शालीनुल हक हे आता फैजुर रहमान यांची जागा घेतील. आर्म्ड फोर्सेस डिव्हिजनचे प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर लेफ्टिनेंट जनरल एस. एम. कमरुल हसन यांनाही परराष्ट्र मंत्रालयात पाठवण्यात आले असून, लवकरच त्यांची रवानगी परदेशात राजदूत म्हणून केली जाण्याची शक्यता आहे. तारिक रहमान यांच्या या पावलामुळे बांगलादेशच्या लष्करावरील बीएनपी (BNP) सरकारचे नियंत्रण अधिक मजबूत झाले असून, भारतविरोधी किंवा पाकिस्तानधार्जिण्या गटांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.