भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या अंतर्गत मोठी घडामोड घडली आहे. बलूच नेते मीर यार बलोच यांनी आज पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, माणसांना गायब करणे आणि मानवाधिकारांचं उल्लंघन हे यामागचं कारण आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, बलुचिस्तानच्या लोकांनी आपला राष्ट्रीय निर्णय घेतला आहे. जगाने आता गप्प राहता कामा नये. त्यामुळे भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून भावूक आवाहन करताना म्हटले आहे की, तुम्ही मारलं तरी आम्ही बाहेर पडू, कारण आम्ही आमचा वंश वाचवण्यासाठी झगडत आहोत. या आम्हाला साथ द्या. पाकिस्तानने कब्जा केलेल्या बलुचिस्तानमध्ये बलूच नेते रस्त्यावर आहेत. बलूचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही हा त्यांचा निर्णय आहे, तसेत याकडे जग मूकदर्शन बनून पाहत राहू शकत नाही.
दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमे, यूट्युबर्स आणि बुद्धिजीवी मंडळींनी बलूच लोकांना पाकिस्तानचे लोक म्हणू नये. आम्ही बलूचिस्तानी आहोत, पाकिस्तानी नाही, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तानचे आपले लोक हे पंजाबी आहेत. त्यांना कधी बॉम्बहल्ले, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि नरसंहाराचा सामना करावा लागलेला नाही. यावेळी बलूच नेते मीर यार बलूच यांनी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडण्याच्या भारताच्या मागणीला पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने हा भाग रिकामी करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणवा अशी मागणीही त्यांनी केली.