कोलकाता : बांगलादेशमधील ढाका जिल्ह्यातील धौर गावात इस्कॉनचे एक मंदिर काही लोकांनी शनिवारी पहाटे जाळल्याचा प्रकार घडला आहे. त्यात मंदिरातील मूर्तीचे नुकसान झाले आहे. बांगलादेशमधील इस्कॉनच्या एका भक्ताच्या कुटुंबाच्या मालकीचे ते मंदिर असल्याचे त्या संघटनेने सांगितले. नमहट्टा इस्कॉन सेंटरवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी केला.
बांगलादेश पोलिसांनी सांगितले की, इस्कॉन मंदिराला आग लावणाऱ्या आरोपींचा कसून शोध सुरू आहे. जमावाने धौर गावातील गाभाऱ्यातील गोष्टींना लावलेली आग काही वेळात विझविण्यात यश आले. मात्र या घटनेत मूर्तीचे नुकसान झाले.
‘बांगलादेशने हल्ले राेखण्यासाठी काहीही केले नाही’बांगलादेशात इस्कॉनच्या लोकांवर, वास्तूंवर हल्ले सुरू आहेत. या प्रकारांकडे इस्कॉनने बांगलादेश सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र, तेथील पोलिस व प्रशासन हल्लेखोरांना रोखण्यासाठी काहीही पावले उचलत नाही असाही दावा राधारमण दास यांनी केला. बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबद्दल तसेच अटक केलेले व जामीन नाकारलेले हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या सुरक्षेबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे की, मंदिरांची नासधूस करण्याच्या विद्वेषी कृत्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणातील आरोपींवर बांगलादेशने कडक कारवाई करावी तसेच धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी.
जम्मू-काश्मीरमध्ये झाली निदर्शनेबांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरमधील भाजप नेते आणि आमदार दिलीपसिंह परिहार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दोडा जिल्ह्यातील भदेरवाह शहरात निदर्शने करण्यात आली. त्यात श्री सनातन धर्म सभा, विश्व हिंदू परिषदेसह भाजप आणि विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
सहा बांगलादेशी घुसखोरांना पकडलेबांगलादेशातील दोन महिलांसह सहा घुसखोरांना आसाम पोलिसांनी पकडले असून, त्यांना त्या देशाच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या कोणत्या भागात ही कारवाई करण्यात आली, हे सरमा यांनी स्पष्ट केलेले नाही.